हिंदुस्थानी हॉकीच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशांना सुरुंग

हिंदुस्थानने ऑलिम्पिक या जगातील प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सुरुवातीच्या काळात देदीप्यमान यश संपादन केले होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुस्थानला आपला दबदबा कायम राखता आलेला नाही. आता पुढल्या वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकच्या आधी हिंदुस्थानी हॉकीचा पाय खोलात गेला आहे. ऑस्ट्रेलियाचे ख्रिस सिरीएलो यांनी अॅनॅलेटिकल म्हणजेच विश्लेषणात्मक पदावरून माघार घेतली आहे. याआधी डेव्हिड जॉन व डेव्हिड मॅकडोनल्ड यांनीही आपले पद सोडले होते.

ऑस्ट्रेलियन हॉकी संघाचे दिग्गज ड्रग फ्लिकर म्हणून ओळखले जाणारे ख्रिस सिरीएलो 2018 साली हिंदुस्थानी हॉकी संघाशी जोडले गेले. यादरम्यान, त्यांनी अॅनॅलेटिकल, सहाय्यक, व्यवस्थापक अशा विविध पदांवर कामही केले. मात्र या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रभाव जागतिक स्तरावर निर्माण झाला आणि हिंदुस्थानातही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. जून महिन्यात हॉकी संघाचे सराव शिबीर रद्द करण्यात आले. त्याप्रसंगी ख्रिस सिरीएलो हे मायदेशी परतले. पण ऑगस्ट महिन्यात हॉकी संघाचे शिबीर पुन्हा सुरू झाले. यावेळी त्यांनी सुरुवातीला व्हीसाचे नंतर आरोग्याचे कारण पुढे करीत हिंदुस्थानात न येण्याचा निर्णय घेतला. पण हिंदुस्थानातील कोरोना अद्याप कमी होत नाही. हे पाहून ते येथे येत नसल्याचे कारण समोर येत आहे.

चार वर्षांमध्ये चार प्रशिक्षक

हिंदुस्थानी हॉकी संघाला गेल्या चार प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. वारंवार प्रशिक्षक बदलणे ही खेदजनक बाब. रोलॅण्ट ओल्टमन्स, जोर्द मरीन, हरेंद्रसिंग व ग्रॅहम रिड या चार प्रशिक्षकांनी गेल्या चार वर्षांमध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळलीय.

हॉकी इंडिया मायदेशातील व्यक्तींना चान्स देणार

हिंदुस्थानी हॉकी संघातील तीन महत्त्वाची पदे रिकामी झाली आहेत. हाय परफॉर्मन्स डायरेक्टर डेव्हिड जॉन, फिजियो डेव्हिड मॅकडोनल्ड व आता अॅनॅलेटिकल कोच ख्रिस सिरीएलो यांनी आपापल्या पदांवरून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे हे तिघेही ऑस्ट्रेलियातील आहेत. आता ही तीन पदे भरण्याची मोठी जबाबदारी हॉकी इंडियावर असणार आहे. या तीन पदांसाठी हिंदुस्थानी व्यक्तींना संधी देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही.

पॅम्पच्या आयोजनाची घाई का?

हिंदुस्थानचा हॉकी संघ आता थेट पुढल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहे. तर मग हॉकीपटूंच्या सराव शिबिराचे आयोजन तडकाफडकी का घेण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच कोरोनाच्या काळात परदेशी प्रशिक्षक हिंदुस्थानात येण्यास तयार नाहीत, असा सूरही यावेळी उमटू लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या