
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
ऐन पावसाळय़ातच ऐतिहासिक रंकाळा तलावातील कासव मृतावस्थेत आढळल्याने या तलावातील जैवविविधतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीही अनेक वेळा तलावातील मासे आणि कासव मृत होण्याचे प्रकार घडले आहेत. तलावात मिसळणाऱया सांडपाण्यामुळे ही जैवविविधता धोक्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, तलावातील प्लॅस्टिक कचऱयाबाबत अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही. यापूर्वी रंकाळय़ातील प्रदूषणामुळे मृतावस्थेत आढळलेल्या मासे, कासव आदी जलचरांचे शवविच्छेदन करून कशामुळे मृत्यू झाला, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न संबंधित विभागाकडून कधीही झाला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
निसर्गसौंदर्य आणि पर्यटनामुळे सतत चर्चेत असणाऱया ऐतिहासिक रंकाळा तलावातील प्रदूषणाचे दुखणे काही संपण्याच्या मार्गावर नाही. रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी कोटय़वधी रुपये खर्ची दाखविण्यात आले, तरीसुद्धा तलावातील जैवविविधता नेहमीच धोक्यात आल्याचे दिसून आले आहे. रंकाळय़ात मिसळणाऱया सांडपाण्यामुळे वाढणारी जलपर्णी आणि प्रचंड दुर्गंधी यांमुळे रंकाळा जलपर्णीमुक्त करण्यासाठी जनआंदोलने झाली. त्यातून कोटय़वधी रुपये खर्च करून तलाव जलपर्णीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्याचा प्रकार झाला. तरीही तलावातील मासे आणि कासव मृत होण्याचे प्रमाण थांबलेले नाही. आज सकाळी संध्यामठ परिसरात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांना जलपर्णी आणि प्लॅस्टिकच्या कचऱयामध्ये मृतावस्थेतील कासव आढळले.
या संदर्भात महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा फोन बंद होता. तर, दुसरे आरोग्याधिकारी विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनाही आज कासव मृतावस्थेत आढळल्याची माहिती नसल्याचे समोर आले.
कासवांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्नही नाही!
आजपर्यंत रंकाळा तलावातील प्रदूषणामुळे असे अनेक प्रकार झाले आहेत; पण मृत होणारे मासे आणि कासव यांचे शवविच्छेदन करून त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा कधी प्रयत्न झाला नाही. तलावात मिसळणाऱया सांडपाण्यामुळे की तलावातील प्लॅस्टिक कचऱयामुळे हे जलचर मृत होत आहेत, याबाबत यापुढे तरी महापालिका प्रशासनाने गांभीर्य दाखविल्यास ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचेही नेमके दुखणे समोर येण्यास मदत होणार आहे.




























































