ट्रॅक्टरची मोटरसायकलला धडक, सरपंच, उपसरपंच जागीच ठार

87
file photo

सामना प्रतिनिधी, साक्री

साक्री तालुक्यातील दातर्ती येथील पांझरा नदीच्या पुलाजवळ ट्रक्टर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दातर्ती गावाचे सरपंच व उपसरपंच जागीच ठार झाले असून ग्रामपंचायत सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ धुळे येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको केला.

दरम्यान प्रांत व तहसीलदारांना तहसीलदार प्रत्यक्ष चर्चेसाठी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत येत नाही तोपर्यंत रास्ता रोको केला. साक्री तालुक्यातील दातर्तीजवळील पांझरा नदीवरील पुलाजवळ काल संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान साक्रीहून गावाकडे मोटरसायकल क्र. एम.एच. 18 ए.टी. 6830 ने दातर्तीचे सरपंच सदाशिव बागुल (32), उपसरपंच गणेश सूर्यवंशी (32), व ग्रामपंचायत सदस्य भास्कर मानकर हे जात होते. त्यावेळी दातर्ती गावाजवळील पांझरा नदीवरील पुलाजवळ समोरून आलेल्या ट्रक्टरने धडक दिल्यामुळे मोटरसायकलवरील सरपंच सदाशिव बागुल, गणेश सूर्यवंशी जागीच ठार झाले. ग्रामपंचायत सदस्य भास्कर मानकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना साक्री येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त ट्रक्टर अवैध वाळू उपसा करणारे असल्याची चर्चा परिसरातून होत असल्यामुळे अवैध वाहतूक करणाऱयाची मग्रुरी साक्री तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळते. जोपर्यंत या अपघातातील ट्रक्टरचा शोध घेतला जात नाही. त्या ट्रक्टर चालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे. याप्रकरणी संपूर्ण गावातील ग्रामस्थ व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळील गेटलगत असलेल्या नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोकोसाठी बसले. सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान रास्ता रोकोसाठी बसलेल्या कार्यकर्त्यांनी प्रांत व तहसीलदारांना तहसीलदार प्रत्यक्ष चर्चेसाठी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू राहील असा पवित्रा घेतला. रविवार असल्याने तहसीलदार नाशिक येथे गेले होते त्यांना नाशिकहून यायला उशीर झाल्यामुळे आंदोलन जवळपास दोन वाजेपर्यंत सुरू होते.

दोन वाजेच्या दरम्यान तहसीलदार संदीप भोसले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱयावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि लवकरात लवकर अपघातातील ट्रक्टरचा शोध घेऊन ट्रक्टर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशाल देसले, विधानसभा मतदारसंघ संघटक पंकज मराठे, चंद्रकांत देवरे, गणेश पवार, किशोर वाघ, मनोज सूर्यवंशी, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, राजेंद्र खैरनार, महेंद्र देसले, डॉ. मुकुंद बोरसे, राकेश दहिते, राकेश अहिरराव, विलासराव बिरारीस, हर्षवर्धन दहिते, उत्पल नांद्रे, अक्षय सोनवणे, दिनेश सोनवणे, दीपक साळुंखे, गुलाबराव सूर्यवंशी, धीरज देसले आदींसह सर्वच राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सुमारे चार तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. यामुळे पोलीस प्रशासनाला फारच कसरत करावी लागली. आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डुंबरे व पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे व त्यांचे सहकाऱयांनी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या