माजी नगरसेवकाच्या घरी जाऊन हजेरी लावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नगर परिषद प्रशासनाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन नगरपरिषदेच्या गैरकारभाराचा पाढा वाचला होता. त्यानंतर नगरपरिषदेने त्यामध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. ज्या प्रभागातील स्वच्छता कर्मचारी सकाळी सात वाजता माजी नगरसेवकाच्या घरी जाऊन हजेरी लावत होते, त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेऊन शहरातील अस्वच्छता, नळपाणी योजनेतील दोष, रखडलेली विकासकामे याबाबत माहिती दिली होती. काही स्वच्छता कर्मचारी हे सकाळी सात वाजता माजी नगरसेवकाच्या घरी जाऊन हजेरी लावत असल्याची तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीकडे मुख्याधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष दिले. अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सूचना त्यांनी त्याचवेळी दिल्या होत्या. नगरपरिषद स्वच्छता विभागाने प्रभाग क्र. 3 आणि 14 मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.

ज्या प्रभागांमध्ये अस्वच्छता आहे, त्या प्रभागांमध्येही काही बदल करण्यात आले. फिल्टर हाऊस येथील कर्मचाऱ्यांची ड्युटी सकाळी सात ते दुपारी दोन अशी आहे. मात्र हे कर्मचारी एक वाजताच घरी जातात अशी तक्रारही महाविकास आघाडी शिष्टमंडळाने केली होती. त्यानंतर नगरपरिषदेने फिल्टर हाऊसमधील कर्मचाऱ्यांना तंबी दिली असून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ड्युटी करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.