
भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले आणि अवघा देश शोकसागरात बुडाला. लता मंगेशकर यांना प्रत्येक जण आपापल्या परिने श्रद्धांजली वाहत आहेत. कुणी लतादीदींची गाणी तर कुणी जुन्या मुलाखती शेअर करत आहेत. अशातच एका मायक्रो आर्टिस्टने खडूच्या तुकडय़ावर लतादीदींची प्रतिमा साकारली आहे. सचिन संघे असे या आर्टिस्टचे नाव आहे. संघे यांनी ट्विटरवर हा अनोखा व्हिडीओ शेअर केला आहे. खडूवरची लतादीदींची लहानसी छबी नेटिजन्सला खूप आवडली आहे. सर्वजण या भन्नाट कलात्मकतेचे काैतुक करत आहेत. या व्हिडीओला लाखो ह्यूज आणि हजारो कमेंट्स येत आहेत. सचिन संघे हे ‘चॉक आर्ट’साठी लोकप्रिय आहेत.
स्मोक आर्टमधून साकारले पोर्ट्रेट
ओडिशा येथील स्मोक आर्टिस्ट समरेंद्र बेहेरा यांनी लतादीदींचे अनोखे पोर्ट्रेट रेखाटून त्यांना मानवंदना दिली आहे. लतादीदी आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या आठवणी कायम सोबत आहेत. स्मोक आर्ट हे माध्यम वापरून मी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे, असे समरेंद्र बेहेरा यांनी म्हटले. 30 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये खडू हातात धरून बेहेरा लतादीदींची कलाकृती साकारताना दिसतात. ‘लग जा गले’ या गीताच्या धूनवर अप्रतिम पोर्ट्रेट तयार होते.