सावरगावजवळ टेम्पोची ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, दोनजण जखमी

लातूरहून हैद्राबादकडे कांदा नेणारा ट्रक मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील सावरगाव येथे थांबला असता मागून आलेल्या भरधाव टेम्पोने ट्रकला धडक दिली. मंगळवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी लातूर येथे नेण्यात आले आहे.

लातूरहून हैद्राबादकडे कांदा नेताना ट्रकच्या दोर्‍या सैल झाल्याने काही कांद्याचे पोते खाली पडले. त्यामुळे चालकाने ट्रक सावरगावजवळ रस्त्याच्या कडेला थांबवला. खाली पडलेले पोते ट्रकमध्ये टाकत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने ट्रकला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात अन्वर मजलेसाहब बहादुरे (वय 28) याचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोमधील गजानन मिरकुटे (वय 52 ) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. तर इतर दोन जण जखमी असून त्यांना उपचारासाठी लातूरला नेण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या