
सामना प्रतिनिधी । मुंबई
नाशिकमधील कारवायांमुळे वादग्रस्त ठरलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर नियोजन विभागात सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. मंत्रालयात त्यांच्या वाटय़ाला ‘बस’काम आल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
तुकाराम मुंढे यांची नियोजन विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे पत्र प्रसिद्ध झाले. धडक निर्णयांमुळे वादग्रस्त ठरत असलेले मुंढे यांच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही नवीन समस्येला सामोरे जावे लागू नये. त्याचप्रमाणे नियोजन विभागात जागा रिक्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात त्यांना आपल्या डोळय़ांसमोर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मुंढे यांची मागील 12 वर्षांच्या प्रशासकीय सेवेच्या कारकीर्दीत 11 वेळा बदली करण्यात आली आहे.
नाशिकच्या महापौर निवासस्थानाबाहेर फटाके फुटले
मुंढे यांच्या बदलीचे आदेश निघताच नाशिकमध्ये काही राजकीय पदाधिकाऱयांनी फटाके फोडले. तसेच महापौर निवासस्थानाबाहेरच फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. तर मुंढे यांची बदली रद्द व्हावी या मागणीसाठी नाशिकमधील नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या बदलीचा विरोध केला.
आदेश मिळालेला नाही
तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे पत्र व्हॉटस् अॅपवरही व्हायरल झालेले असताना मुंढे यांनी मात्र या बाबीचा इन्कार केला. आपल्याला बदलीचा कोणताही आदेश मिळालेला नाही. आपण काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
























































