
विजय जोशी । नांदेड
शहरातील गजबजलेला भाग असलेल्या तरोडा नाका परिसरातील भावसार चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम फोडून चोरट्यांनी जवळपास १६ लाख ४ हजार रुपये लंपास केले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेच्या तपासासाठी दोन पथके रवाना केली.
दरम्यान एटीएम फोडणाऱ्या या आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील जालम पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओ गाडी, देशी कट्टा व ५५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वीही या आरोपींनी २४ आणि २५ जून रोजी नागपूर येथे एटीएम फोडून रक्कम लंपास केली होती. या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी भाग्यनगर पोलीस बुलढाणा येथे रवाना झाले.
शहरात पोलिसांची रात्रीची गस्त होत नसल्यामुळे चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणचे एटीएम फोडल्याच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भाग्यनगर पोलीस ठाण्यातंर्गत हा गुन्हा घडलेला असून, गेल्या काही दिवसांपासून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी आणि लुटीच्या घटना वाढल्या आहेत. आता तर एटीएम फोडूनच चोरट्यांनी पोलिसांना सलामी दिली असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

























































