
सामना प्रतिनिधी, पालघर
नगर परिषद निवडणुकीच्या निकालापूर्वीच शिवसेना-भाजप युतीने ‘विजया’चा गुलाल उधळला आहे. उमेदवारी अर्ज छाननीत 11 जणांचे अर्ज बाद झाले असून युतीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे छाननीतच विरोधकांना ‘पराभवा’ची धूळ चाखावी लागली आहे.
पालघर नगर परिषदेसाठी 24 मार्च रोजी निवडणूक होत आहे. 14 प्रभागांमधून पॅनल पद्धतीने 28 नगरसेवक निवडून येणार आहेत, तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार आहे. 28 जागांसाठी 148 उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर नगराध्यक्षपदासाठी 11 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्जांच्या झालेल्या छाननीमध्ये सूचकाची स्वाक्षरी नसणे, तर काही सूचक हे नगर परिषद हद्दीच्या बाहेरील तर जातपडताळणी दाखला नसल्याने 11 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या अलका राजपूत व गीता संखे या बिनविरोध निवडून आल्या असून विजयानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या विजयामुळे भाजपने पालघर नगर परिषदमध्ये प्रथमच खाते उघडले आहे.

























































