
सामना प्रतिनिधी, अलिबाग
कर्जतपासून अवघ्या 40 किमी अंतरावर असलेल्या कोथळीगड उर्फ पेठ किल्ला या गडावर आजवरच्या इतिहास अभ्यासक संशोधक यांनी लिखाण केलेल्या गडाच्या इतिहासात दोन तोफांची नोंद आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी अजून एका तोफेचा शोध लावला असून या तोफेला नवसंजीवनी मिळवून दिली आहे. गडावरील व गडाच्या पायथ्याशी असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे तोफगाड्यात विराजमान केले आहे. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते.
कोथळीगड उर्फ पेठ किल्ला येथे दोन तोफा असल्याची इतिहासात नोंद आहे. त्यातील एक तोफ गडाच्या माचीवरील पेठ या गावात लहान उखळी तोफ आहे तर गडावर दुसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दुसरी 6.5 फूट लांबीची तोफ होती, अशी नोंद मिळते. बऱ्याच इतिहास अभ्यासकांनी गडावर तिसरी तोफ नाही असे सांगितले. कोथळीगडाच्या इतिहासाच्या आधारे या गडाचा मराठी इंग्रजी कागदपत्रातून तसेच मुघली कागद पत्रातून एक बलाढ्य संरक्षण ठाणे होत आणि मराठ्यांचे या गडावर शस्त्रागार होते. संभाजी महाराजांच्या काळात या गडाला विशेष महत्व आले होते पुढे पेशवे काळात हि हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता तर 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून याच्या वास्तूची तोडफोड केली.
कोथळी गडावर दोन तोफा असल्या तरी अजून तोफ असल्याची माहिती गावकाऱ्याकडून कळली होती. त्यानुसार सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने तिसऱ्या तोफेचा शोध सुरू केला. तेव्हा गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या 100 फूट खाली एका भल्या मोठ्या दगडाखाली मातीत बुजलेली 4.5 फूट लांबीची तोफ सापडली.
सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागाने मोहिमेची तयारी केली आणि संस्थेचे संस्थापकृ श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे नियोजन झाले. या तोफेला मातीतून बाहेर काढून दोराच्य साह्याने 100 फुट वर असलेल्या प्रवेशद्वार पासून जवळ असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. जवळपास 5 तास संस्थेच्या 60 सदस्यांनी भर उन्हात श्रमदान करून या तोफेला नवी संजीवनी दिली आहे. आजवर कोथळी गडावर दोन तोफा होत्या परंतु गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीने शोध घेऊन तोफेचा शोध घेऊन इतिहासापासून लुप्त झालेल्या तोफेला उजाळा मिळाला त्याबद्दल श्रमिक गोजमगुंडे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. तसेच पुरातत्व विभागाने केलेल्या सहकार्य बद्दलही आभार व्यक्त केले. अशी माहिती कर्जत विभाग अध्यक्ष सुधीर साळोखे यांनी दिली.
पेठ गडावर लुप्त झालेल्या तोफेला नवसंजीवनी मिळाली असून या तोफेला लाकडी तोफगाड्यात विराजमान केले आहे. तोफगाडा दुर्गापन सोहळा 10 जून रोजी सकाळी पार पडला. सकाळी ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत झाले. शिवरायांच्या मूर्तीचे पूजन झाले सर्व मान्यवरांनी गडावरील तोफेची पूजा करून त्यांनी तोफगाडा अनावरण केले. दुपारी गड पायथ्याशी तीन शाहीर रायगड भूषण वैभव घरत, गणेश ताम्हणे आणि पोलीस दलातील शाहीर होते. शाहिरांनी गडकिल्ले संवर्धनाच्या पोवाड्याने संपूर्ण वातावरण हि शिवमय केले.
तसेच या सोहळ्याला सिद्धार्थ कंक (सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज), दिग्विजयसिंग पवार,(श्रीमंत साबूसिंग यांचे वंशज), राजकुमार पायगुडे (सरदार मानाजी पायगुडे यांचे वंशज) तर प्रमुख उपस्थित मंगेशभाई दळवी (सरपंच मांगरूळ पेन), अमोल जाधव(भाजप युवा मोर्चा प्रदेश चिटणीस,सदस्य मुंबई नियोजन समिती) हे मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संथापक श्रमिक गोजमगुंडे यांनी मान्यवरांचे आभार मानले. तसेच कर्जत विभाग अध्यक्ष यांनी येत्या काही महिन्यात कर्जत विभागाकडून कोथळी गडाच्या दरवाजाला पुरातत्व निकषाने सागवानी कवाड (दरवाजा) बसविण्यात येईल असे सांगितले. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात शिवप्रेमीं उपस्थित होते.


























































