चेंबूर येथे शौचालयाची टाकी खचून दोघे जखमी, ट्रकची धडक बसल्याने दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

चेंबूर वाशी नाका येथे बुधवारी दुपारी ट्रकची धडक बसून शौचालयाची सेप्टीक टँक खचल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली. मरियम शेख (11) व अरुणा मांडवकर (30) अशी या जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

चेंबूर वाशी नाका येथील ‘म्हाडा’ कॉलनीसमोरील विनय इंग्लिश हायस्कूल येथे बुधवारी दुपारी 1.40 च्या सुमारास ट्रक मागे घेताना सेप्टीक टँकला धडक बसून ट्रक टँकमध्ये फसला. यात तिथे असलेले दोनजण अडकले. आरएफसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागा बाबा दर्गा, म्हाडा कॉलनी येथील स्थानिकांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी टँकमध्ये अडकलेल्या लोकांना तत्काळ बाहेर काढले. जागा दलदलीची असल्याने पोलिसांनी नागरिकांना या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे.