
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाण्याकरिता दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे नांदेड विभागातून पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
पहिली गाडी (क्रमांक ०७५०१) अदिलाबाद -नांदेड -पंढरपूर १८ नोव्हेंबरला धावेल. अदिलाबाद येथून दुपारी २ वाजता ही रेल्वे सुटेल. नांदेड येथून सायंकाळी ७.२५ वाजता सुटेल. पंढरपूर येथे १९ तारखेला सकाळी ८ वाजता पोहोचेल. गाडी (क्रमांक ०७५२७) पंढरपूर- नांदेड अशी १९ नोव्हेंबरला पंढरपूर येथून सकाळी ११.१० वाजता सुटेल. नांदेड येथे रात्री ११ वाजता पोहचेल. दुसरी गाडी (क्रमांक ०७५२८) नांदेड ते पंढरपूर २२ नोव्हेंबरला नांदेड येथून रात्री ७.२५ वाजता निघून २३ तारखेला पंढरपूरला सकाळी ८ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात २३ नोव्हेंबरला ही रेल्वे (क्र. ०७५०२) पंढरपूर येथून रात्री १० वाजता सुटेल. २४ नोव्हेंबरला नांदेडला १२.४० वाजता तर अदिलाबादला सायंकाळी ४.४० वाजता पोहोचेल. या गाडीस बारा डब्बे असतील.
अकोट, बीड येथील रेल्वे आरक्षण कार्यालय बंद
तांत्रिक कारणांमुळे अकोट रेल्वेस्थानक आणि बीड शहरामधील आरक्षण कार्यालय रेल्वे प्रशासनाने तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वेचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. अकोट रेल्वेस्थानक व बीड शहरातील आरक्षण कार्यालयाद्वारे मोठ्या प्रमाणात महसूल दक्षिण मध्य रेल्वेला मिळत असतो. बीड येथून रेल्वे नसली तरीही या आरक्षण कार्यालयातून तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु अकोट व बीड येथील कार्यालये १७ नोव्हेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयाबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रविवारी जनशताब्दी रद्द
मुंबई विभागातील कल्याण रेल्वेस्थानकावरील मेगा ब्लॉकचा फटका जालना, संभाजीनगर, मनमाड, नाशिक येथील प्रवाशांना बसला आहे. मेगा ब्लॉकमुळे १८ नोव्हेंबरला जालना-दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण आठ ते दहा दिवसांपर्यंत वेटिंगवर आहे. असे असतानाही मुंबईकडे जाणारी व दादरहून जालन्याकडे येणारी जनशताब्दी रेल्वे रविवारी रद्द करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण रेल्वेस्थानकावर मेंटेनन्ससाठी हाती घेण्यात आलेल्या मोठ्या कामामुळे रेल्वे रद्द करावी लागली आहे.





























































