
सामना ऑनलाईन । श्रीनगर
अमरनाथ यात्रेपूर्वी कुलगाममध्ये सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू झालेल्या चकमकीत जवानांनी ‘जैश ए मोहम्मद’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. या भागात अजून दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू आहे.
कुलगाम जिह्याच्या चाद्दरभान भागात अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू होती. सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या भागात अजून काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिण कश्मीरमध्ये २५० दहशतवादी असल्याची शक्यता
दक्षिण कश्मीरमध्ये अजूनही २५० ते २७५ दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली. ऑपरेशन ऑल आऊट सुरू असून लवकरच या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात येईल असे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. आठवडाभरात सुरक्षा दलाने ११ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

























































