
सामना ऑनलाईन । मुंबई
पत्ता विचारण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अरीफ शेख आणि फर्याद अशी या दोघांची नावं आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांना एखादा चूकीचा पत्ता विचारून हे भुरटे त्यांना बोलण्यात गुंतवत होते आणि हातचलाखी करून त्यांच्याकडील ऐवज लुटत होते.
शनिवारी मुलुंड पूर्वेला अरिफ आणि फर्याद एका ज्येष्ठ नागरिकाला हाचलाखी करून गंडवत होते. त्याचवेळी नवघर पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं. या जोडीने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. दोघेही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे आणि मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.




























































