
संयुक्त अरब अमिराती (UAE) चे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी रविवारी अल मिन्हाद जिल्ह्याचे आणि त्याच्या आसपासच्या भागाचे ‘हिंद शहर’ असे नामकरण केले. या शहरामध्ये एकूण चार झोन समाविष्ट आहेत – हिंद 1, हिंद 2, हिंद 3 आणि हिंद 4 जे एकूण 83.9 किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. हिंद शहर हे एमिरेट्स रोड, दुबई अल ऐन रोड आणि जेबेल अली-लेहबाब रोड यांसारख्या प्रमुख रस्त्यांनी जोडलेले आहे.
UAE मधील एखाद्या ठिकाणाचे नाव बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2010 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीचे तत्कालीन अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या नावावर बुर्ज दुबईचे नाव बुर्ज खलिफा असे करण्यात आले. 13 मे 2022 रोजी त्यांचे निधन झाले.
अल मिन्हाद जिल्ह्याचे ‘हिंद शहर’ असे नामकरण करणारे शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हे संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तसेच दुबईचे शासक आहेत. संयुक्त अरब अमिरातीचे माजी उपराष्ट्रपती आणि दुबईचे शासक शेख रशीद बिन सईद अल मकतूम यांचे ते तिसरे पुत्र आहेत. 2006 मध्ये त्यांचा भाऊ मकतूमच्या मृत्यूनंतर, शेख मोहम्मद यांनी देशाचे उपराष्ट्रपती आणि दुबईचे शासक म्हणून पदभार स्वीकारला. ‘जगातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक’ म्हणून अल मकतूम यांची ओळख आहे.



























































