
सामना ऑनलाईन । मुंबई
कामचं मिळत नसल्याने गेल्या सहा वर्षांपासून बेकार असलेला बॉलीवूड अभिनेता उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये असून सध्या विरक्त आयुष्य जगत आहे. पण हे बिनकामाचं जगणं ओझं वाटत असल्याने लवकरच आपण आत्महत्या करणार असल्याचा इशारा त्याने शनिवारी रात्री टि्वटरवर दिला आहे. उदयच्या या टि्वटमुळे त्याचे चाहते मात्र हादरले आहेत. दरम्यान, उदयने ते ट्वीट नंतर डिलीट केले आहे.

पण त्याच्या ट्वीटचा स्क्रिन शॉट व्हायरल झाला आहे. ”मी बरा नाहीये. हे मी कबूल करतोय. पण आतापर्यंत मी अनेकवेळा प्रयत्न केला मात्र अयशस्वी झालो,” असं उदयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ”मी काहीवेळापुरतं माझं अकाऊंट डिएक्टीवेट केलं होत. कारण मला वाटलं मी मरणार आहे. अस वाटणं पण विलक्षण आहे. मला वाटतं आत्महत्या करणं हा एक चांगला पर्याय आहे. लवकरच मी तो प्रत्यक्षात आणणार” असं उदयने ट्वीटमध्ये म्हटल. त्याची ही मनोव्यथा बघून त्याचे चाहतेही घाबरले. दरम्यान उदयच्या या ट्वीटनंतर तो डिप्रेशनमध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याआधी 2018 मध्येही त्याने मानसिक विकाराबद्दल एक ट्वीट केलं होते. जर तुम्ही किंवा तुमची एखादी आवडती व्यक्ती मानसिक विकाराने ग्रस्त असेल तर कृपया त्याची मदत करा, असे त्याने म्हटले होते.
दरम्यान, उदय 2013 साली प्रदर्शित झालेल्या धूम-3 या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर त्याचा एकही चित्रपट आला नाही. पण यादरम्यान वादग्रस्त ट्वीट करत उदयने खळबळ उडवली होती. 2018 साली त्याने गांजाला कायदेशीर मान्यता द्या, अशी मागणी केली होती. त्याच्या या ट्वीटवर मुंबई पोलिसांनी त्याला झापले होते.


























































