एवढ्या मोठ्या घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच ‘त्या’ पदावर राहू शकतो! उदयनराजे यांचा दांडपट्टा फिरला

राज्यपालांनी एवढी मोठी घोडचूक केली आहे, की त्यानंतर एखादा निर्लज्जच ‘त्या’ पदावर राहू शकतो, असा घणाघात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे बोलताना केला.

कुठली ही मस्ती? काय कारण होते बोलायचे? त्यांनी हे कसे केले मला कळत नाही. त्यांचे वय पाहता त्यांच्यासाठी चांगला वृद्धाश्रम बघा. पण तिथे तरी घेतील का नाही मला माहीत नाही. कारण तिथेसुद्धा हे काहीतरी वाद-विवाद निर्माण करतील आणि मग बाकीचे सगळे त्यांची तिथूनही हकालपट्टी करतील, असा टोलाही उदयनराजे यांनी लगावला.

सातारा येथे आज जलमंदिर पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. ती होईल याची मला खात्री आहे. तथापि, त्यासंबंधीच्या औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवरायांच्या विचारानेच या देशाला अखंड ठेवले आहे. त्यांच्या विचारांचा विसर पडला, तर या देशाचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही, अशी भीती खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. जे कोणी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन करत असतील, त्यांनी कोश्यारींचे नाव घ्यावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे घेऊ नये, अशा तिखट शब्दांत उदयनराजेंनी नाव न घेता भाजप नेत्यांचा समाचार घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक करण्याचे प्रकार वारंवार होत असताना आपण कोडगे झाले आहोत का? असे होत राहिले तर ती एक पॅशन होईल. काहीही बोलले तरी चालते, असे या लोकांना वाटेल. उद्या आणखी कोणी नेता काही विधान करेल, आपण खपवून घेणार आहोत का? असा सवाल त्यांनी केला.

यांच्या विकृतीमुळे विचारच राहिलेले नाहीत. समाजात भेदभाव, तेढ निर्माण केली जात आहे. याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
सीमाप्रश्न हे महाजन आयोगाचे पाप आहे. पण ठीक आहे, त्यांनी चूक केली. शेवटी माणूसच आहे. त्यामध्ये आपण दुरुस्ती करू शकतो ना, असे ते म्हणाले.

लोढा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार

शिवप्रताप दिन कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला कोणी पकडून नेलेले नव्हते. ते स्वतः तिकडे गेले होते. शिवरायांनी माफीनामा तर कधीच दिला नव्हता, असेही उदयनराजे यांनी ठणकावून सांगितले.

शिवरायांचा अपमान करणाऱयांना शासन व्हायलाच हवे असे उदयनराजे यांनी ठणकावले. राज्यपाल हटावच्या मागणीवर ते ठाम आहेत. 3 डिसेंबरला ते पुढचा निर्णय घेणार आहेत.

आपण सध्या अशी भूमिका घेतल्यामुळे पक्ष कारवाई करेल, असे आपणास वाटते का? असे पत्रकारांनी विचारले असता, माझ्यावर कारवाई करणारा जन्माला यायचा आहे, असे प्रत्युत्तर उदयनराजे यांनी दिले.

भाजपची साथ सोडणार?

माझ्यावर कारवाई करणारा जन्माला यायचा आहे. कोणाला काय करायचे असेल ते करा, मला फरक पडत नाही. मी पक्ष मानत नाही, माझ्यासाठी फक्त छत्रपतींचा विचार महत्त्वाचा आहे. कोश्यारी यांच्यावर कारवाई करून भाजपने हा वाद मिटवला नाही तर भाजपमध्ये राहायचे की नाही याबाबत आपण विचार करू शकतो, असा सूचक इशाराच खासदार उदयनराजेंनी यावेळी दिला.