
सामना ऑनलाईन, पालघर
स्थानिक जनतेचा विरोध होता म्हणून शिवसेनेने नाणार प्रकल्प घालवला. तसा पालघरमध्ये वाढवण बंदराला भूमिपुत्रांचा विरोध असेल आणि हा प्रकल्प त्यांच्या मुळावर येणार असेल तर नाणार घालवला तसे वाढवण बंदरही घालवणारच, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना विकासाच्या विरोधात नाही, पण जीव घेणारा विकास आम्हाला नकोच, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी पालघर जिह्याचा सलग दोन दिवस झंझावाती दौरा केला. मंगळवारी तळपत्या उन्हात वसई ते पालघर असा 11 तास संपर्क-संवाद दौरा केल्यानंतर आज डहाणू ते विक्रमगड, जव्हार, मोखाडा असे प्रचाराचे भगवे तुफान उसळले. उन्हाचा पारा चढत होता तसा प्रचारही टिपेला पोहोचला होता. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी ठिकठिकाणी जनसमुदाय प्रचंड मोठय़ा संख्येने उपस्थित होता. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9.30 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे यांनी बंदरपट्टीपासून जंगलपट्टीचा परिसर पिंजून काढत गावागावात जाऊन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. फटाक्यांची आतषबाजी आणि ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला…’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा गगनभेदी घोषणांनी उद्धव ठाकरे यांचे जागोजागी जल्लोषात स्वागत झाले. मोखाडाच्या वेशीवर आदिवासी तरुण-तरुणींनी तारपा नृत्य करून उद्धव ठाकरे यांना सलामी दिली. पालघर जिह्यात फक्त आणि फक्त भगव्याचाच आवाज घुमत होता.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी वाढवण बंदर व त्यासारखे विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यामुळे मासेमारीवर कुटुंबाचा गाडा चालवणारे लाखो भूमिपुत्र देशोधडीला लागतील. शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार गेला, पण वाढवण बंदराचे काय याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच उद्धव ठाकरे म्हणाले, मला पालघरमधील भूमिपुत्रांच्या समस्या माहीत आहेत. पालघर जिल्हा आता बाळसं धरतोय. इथे वाढवण बंदराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्थानिकांचा विरोध असेल तर काही झाले तरी हा प्रकल्प घालवणार म्हणजे घालवणारच.
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घ्यावे लागतात अशी कबुली भाजप, जेडीयू आणि आपच्या खासदारांनी दिली. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रकार गंभीर आहे, पण आमच्या युतीतले कोणी असेल असे मला वाटत नाही. त्यात भाजपचे वर्धाचे खासदार रामदास तडस यांचे नाव आल्याचे पत्रकाराची सांगताच तुम्ही त्यांनाच विचारा आणि भाजप या प्रश्नाचे उत्तर द्यायला समर्थ आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राजेंद्र गावीत यांना विक्रमी मतांनी विजयी करून पालघरवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, पालघर जिल्हा संघटक श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेश शाह, पालघर जिल्हा महिला संघटक ममता चेंबूरकर, महिला विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, पालघर समन्वयक प्रभाकर राऊळ, विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, प्रफुल्ल पवार, जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, तालुका संघटक चित्रांगण घोलप यांच्यासह शिवसेना, भाजप, आरपीआय, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युती झाली असली तरी गाफील राहू नका
महायुतीच्या कार्यकर्त्यांनो, युती झाली असली तरी गाफील राहू नका. एकत्र व्हा, घरोघरी जा. मतदारांना आपली कामे सांगा. मतदारांना मतपेटीपर्यंत पोहोचवा. जागते राहा आणि महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करा, असा विजयाचा मंत्र उद्धव ठाकरे यांनी ठिकठिकाणी झालेल्या संवाद सभेत कार्यकर्त्यांना दिला.
ख्रिस्ती तरुणांचा शिवसेनेत प्रवेश
वसईच्या ख्रिस्ती समाजातील असंख्य सुशिक्षित तरुणांनी विजय मच्याडो, सचिन मेंडीस आणि लुकास फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी भगवा झेंडा हाती देऊन त्यांचे स्वागत केले. वसईतील एकाधिरशाहीविरोधात आमचा संघर्ष आहे आणि शिवसेना हाच त्यासाठी योग्य पर्याय आहे म्हणूनच आम्ही भगवा हाती घेत असल्याचे या तरुणांनी सांगितले.
अब तेरा क्या होगा ठाकूर?
श्रीनिवास वनगा यांनी माझी आणि राजेंद्र गावीत यांची शोलेसारखी जय आणि वीरूची जोडी जमली आहे असे सांगितले. हाच मुद्दा पकडून उद्धव ठाकरे यांनी तुमचा तर अजून उमेदवारही जाहीर झाला नाही…अब तेरा क्या होगा ठाकूर? असे सांगताच उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे लेझीम
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार तडाखे लगावले. ते म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेसचा कारभारच बेकाबू झाला आहे. त्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राजीनामा द्यायला निघाले आहेत, तर दुसरीकडे महायुती जाहीर होताच शरद पवारांनी माढातून पळ काढला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे असे लेझीम सुरू आहे. ते त्यांना खेळत बसू द्या.
हिंदू दहशतवाद हा किडा कोणाच्या डोक्यातला?
एनआयएच्या यादीत हिंदू दहशतवाद्यांची नावे आली आहेत. त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्या आहेत त्याबद्दल काय सांगाल, असे विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदू दहशतवाद हा किडा कुणाच्या डोक्यातला आहे हे मला माहीत नाही. असा काही प्रकार असेल असेही मला वाटत नाही. हिंदू दहशतवाद म्हणणारा माणूस नक्कीच हिंदुस्थानातील नसावा.































































