
‘50 खोके ची घोषणा कानाकोपऱ्यात गेली. आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी व मुंबई गिळायला लागलेयत हे बोके’, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला लगावला. धारावीकरांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महामोर्चा अदानींच्या कार्यालयावर धडकला. यावेळी उद्धव यांनी जबरदस्त भाषण करत मिंधे सरकार, भाजप व अदानींना फटकारले.
‘’अडीच वर्ष यशस्वी पणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं. त्यांना खोके कुणी पुरवले. विमानं कुणी पुरवली, हॉटेल बुकींग कुणी केलं असेल. आता सर्व समोर येतंय. जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट आलं, तेव्हा पहिला धावतो तो शिवसैनिक आहे. त्यांना जेव्हा कळलं की उद्धव ठाकरे यांना जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबई गिळता येणार नाही. त्यामुळे यांनी आमचं सरकार पाडलं. आता समोर येतंय की 50 खोके कुणी, कशासाठी दिले, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
























































