
एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवता, लोकांच्या मतावर जिंकून येता आणि तुमच्यावर ईडीची बला आली की ती झाकायला गद्दारी करून पलीकडे जाता. असले मिंधे राजकारण छत्रपती शिवरायांनी कधीही केले नाही. आग्य्रामध्येही शिवाजी महाराज औरंगजेबासमोर झुकले नव्हते, ताठ मानेने उभे होते. त्या मातीत गद्दार जन्माला आले असतील आणि ते दिल्लीश्वरांसमोर झुकत असतील तर त्यांना फक्त झुकवू नका, रायगडचे टकमक टोक दाखवून त्यांना सपाट करून टाका, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन येथील अत्याधुनिक शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्यात आले. त्याचे लोकार्पण उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
आरक्षणावर मोदी अवाक्षरही काढत नाहीत
महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न धुमसतोय. या प्रश्नावर महाराष्ट्रात आलेले मोदी बोलतील अशी माझी अपेक्षा होती. कारण तो त्यांच्याच अखत्यारीतला प्रश्न आहे, पण त्यावर त्यांनी अवाक्षरही काढले नाही. मणिपूर पेटतंय मात्र बोलायचं नाही.. आरक्षणाच्या मुद्दय़ावर लोक रस्त्यावर उतरलेत, आत्महत्या करताहेत, पण मी त्या गावचाच नाही असं ते दाखवतात आणि कशावर तरी बोलून निघून जातात हे त्यांचं वैशिष्टय़ आहे असे टीकास्त्र्ा उद्धव ठाकरे यांनी सोडले.
तुम्ही बँकवाले… आम्ही व्होट बँकवाले…
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. तो धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, जयंतराव तुम्ही बँकवाले… आम्ही व्होट बँकवाले… आमच्या त्या बँकेत किती ठेवी आहेत, त्या कशा वाढतील आणि किती खातेदार येतील ते आम्ही बघतो आणि जपण्याचा प्रयत्न करतो. आताही ‘इंडिया’च्या बँकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप आणि देशभरातील सगळे पक्ष लोकशाही बँकेतले लोकशाही वाचवणारे खातेदार आहेत. या बँकेचे भवितव्य तुमच्या हातात आहे. जोपर्यंत मतदार जागृत आहेत तोपर्यंत आमच्या भवितव्याला कोणताही धोका नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘इंडिया’ आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंकडे आदराने पाहतात
देशात समविचारी पक्षांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडी केली आहे. कुठलीही राजकीय आणि सामाजिक काम एकत्र करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्यामुळे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ‘इंडिया’ आघाडीतील सर्व नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे आदराने पाहतात असे गौरवोद्गारही पाटील यांनी काढले. सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत काम करणारे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना नावाने ओळखणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते शरद पवार आहेत. पहिली कर्जमाफी शरद पवार यांनीच केली होती याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
हुकूमशाहीला गाडणारच… देशाला गुलाम बनवण्याचा डाव तोडून-मोडून टाकू!
भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप व्यासपीठावर एकत्र आल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, याआधी आमच्या शेकापसोबत मारामाऱया झाल्या आहेत, पण तो जो काही विरोध होता तो व्यक्तिगत नव्हता. आमच्यात सुडाचं राजकारण कधीच कुणीही केलं नाही. शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री तर जगजाहीर होती. तशीच बाळासाहेबांची अंतुलेंसोबतही मैत्री होती. जिथे मतं पटायची नाहीत तिथे विरोध केला, पण आता विरोधक असेल तर त्याला संपव आणि त्याच्यासोबत कोण असेल तर त्यालाही संपव असं सुडाचं राजकारण सध्या सुरू आहे. तुम्ही किती सूड घेणार? शेवटी महात्मा फुलेंच्या शेतकऱयांचा आसुड कडाडला की भलेभले गारद होतात. हीच सर्वसामान्यांची ताकद आहे. सत्ताधारी कितीही माजला तरी त्याला सर्वसामान्यांपुढे झुकावेच लागते, हाच आपल्या देशाचा इतिहास आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, वृत्तीच्या विरोधात आहोत. तुमच्या या हुकूमशाहीला गाडण्यासाठीच आम्ही ‘इंडिया आघाडी’ म्हणून एकत्र आलो आहोत. देशाला गुलाम बनवण्याचा जर तुमचा डाव असेल तर तो आम्ही तोडूनमोडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे जबरदस्त तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले.
बेइमान लोकांच्या डोक्यावर हात ठेवू नका – जयंत पाटील
काही लोक केलेले उपकार विसरून जातात. त्यामुळे बेइमान लोकांच्या डोक्यावर हात ठेवू नका. आता काळ बदलला आहे. आपण नव्याने सुरुवात करूया अशी विनंती आमदार जयंत पाटील यांनी शरद पवार यांना केली. इंडिया आघाडीची पुढची सभा रायगडात होईल असे सांगतानाच रायगडचे खासदार अनंत गीते असतील, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
आम्ही सर्व मनाने एकत्र -पृथ्वीराज चव्हाण
केव्हा तरी आम्ही एकमेकांच्या विरोधात काम केले होते. आता सर्वजण मनाने एकत्र आलो आहोत. यात ‘इंडिया’ आघाडीचे मोठे यश आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी लोकाभिमुख काम करून देशात वेगळी ओळख निर्माण केल्याचे ते म्हणाले.
मोदी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर का बोलले नाहीत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी राष्ट्रवादीच्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर बोलले होते. काल शिर्डीत त्यांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेखच केला नाही. कारण स्टेजवर कोणीतरी बसलं होतं, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. हे जे सगळं त्यांचं थोतांड सुरू आहे ते टीव्हीवर सगळे बघताहेत असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले. मनमोहन सिंग पंतप्रधान होते व शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा शिवसेना आंदोलन करत होती, पण कृषीमंत्री असताना पवारांनी देशात पहिल्यांदा 70 हजार कोटींची कर्जमाफी केली. याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या आरोपातील हवा काढली.
समाज, जातीधर्मात कटुता वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न
सध्या देशात एकोप्याची गरज आहे. मात्र समाजा-समाजात अंतर निर्माण करणे, जातीधर्मात कटुता वाढवणे असे कार्यक्रम जाणीवपूर्वक काही लोकांच्या माध्यमातून राबवले जात आहेत, असे टीकास्त्र्ा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोडले. ही कटुता संपवून देशात एकोपा टिकवण्यासाठीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, डावे पक्ष आणि इतर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या विकासासाठीच हा निर्णय असल्याने सर्वांनी आम्हाला साथ द्या, अशी साद शरद पवार यांनी घातली.
आपल्या भाषणात पवार यांनी माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. अंतुले आणि मी आम्ही एकत्रित आणि विरोधातही काम केले. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. देशाचे हित कशात आहे या गोष्टींचा विचार करणारा नेता रायगडने दिला. अनेक मान्यवरांनी महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचे काम केले, असे पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी सहकार क्षेत्राबाबतही मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देशातील सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. राज्यातील जिल्हा बँका चांगले काम करत आहेत. महाराष्ट्रात सहकार चळवळीचे काम सुरू आहे. माध्यमातून लहान व्यक्तीला शक्ती देण्याचे काम केले जाते. सहकार चळवळीत बँकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्ता येते आणि जाते, पण संस्था टिकलीच पाहिजे. कोणावरही व्यक्तिगत राग नसावा, असा सल्लाही पवार यांनी दिला. राज्यात रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लौकिक असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.






























































