
राज्यात पारंपरिक वृक्षलागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यावर वन विभागाने भर द्यावा आणि वृक्षारोपण करताना खरे उद्दिष्ट ठरवून खरेखुरे उद्दिष्ट गाठावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
पावसाळ्यातील वृक्षलागवडीची योजना आखण्यासाठी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. यंदा पावसाळ्यात 4 कोटी रोपे लावण्यात येणार आहेत, असे वन विभागाने सांगितले.
तोरणमाळचाही समावेश
जव्हार, कोल्हापूर, सावंतवाडी, वन विभाग, मेळघाट, अमरावती वन विभाग व नांदेड वन विभागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणी करताना नंदुरबार जिह्यातील तोरणमाळचाही त्यात समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या वेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.
भौगोलिक प्रदेशानुसार वृक्ष
राज्यातील भौगोलिक प्रदेशानुसार पावसाळी परिस्थिती व हवामानाची स्थिती, जमिनीचा अंदाज घ्या. जी झाडे उपयुक्त आहेत त्याप्रमाणे वृक्षारोपण करावे. वृक्षलागवडीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
पर्यटनाची सांगड
वृक्षलागवड करताना पर्यटनाचाही विचार करावा. शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा पर्यटकांना आकर्षित करणारी शोभिवंत झाडे लावावीत. तसेच जपानमध्ये ज्याप्रमाणे माऊंट येशीनो येथे नैसर्गिकरीत्या दरी फुलून जाते त्याप्रमाणे राज्यात डोंगर उतारावर काय करता येईल याचाही विचार वन विभागाने करावा. झाडांच्या देशी प्रजाती लावण्यावर भर देण्यात यावा जेणे करून पक्ष्यांनादेखील खाद्य व आश्रय मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वांचा सहभाग आवश्यक
वृक्षलागवड करताना पर्यावरणप्रेमी, जंगलप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा. यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्षलागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे. जनतेला आपली वाटेल अशी ही वृक्षलागवड योजना झाली पाहिजे, अशी अपेक्षा या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
























































