
दादरच्या शिवाजी मंदिरसमोरील जे. के. सावंत मार्गाला अनधिकृत भाजीविक्रेते, फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. खांडके बिल्डिंग इमारत क्रमांक 11 आणि 12, मिरांडा चाळीतील रहिवाशांना दररोज पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी आठ-साडेआठ वाजेपर्यंत या भाजीविक्रेत्यांच्या अरेरावीचा सामान करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांत जे. के. सावंत मार्गाने चायनीज गल्लीचे रूप घेतले असून विविध प्रकारच्या चायनीज भाज्या विकणाऱया लोकांनी येथील स्थानिक रहिवाशांचे जगणे मुश्किल केले आहे. गेली कित्येक वर्षे रात्रीची झोप नाही. सकाळच्या सुमारास एकही टॅक्सीवाला जे. के. सावंत मार्गावर यायला तयार होत नाही. भाजीविक्रेत्यांच्या ट्रफिकमध्ये अडकलेली स्कूलबस, अॅम्ब्युलन्स, विव्रेते आणि ग्राहकांच्या गर्दीतून वाट काढत रूपारेल कॉलेज गाठणारे विद्यार्थी हे चित्र आता नित्याचेच झाले आहे. रस्त्यावरच्या या गोंगाटाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे तर अक्षरशः वाटोळे झाल्याची तक्रार येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
खांडके बिल्डिंग आणि मिरांडा चाळीतील तळमजल्यावरील अनेक गाळे चायनीज भाज्याविक्रेत्यांनी भाडय़ाने घेतले आहेत. पूर्वी पेंब्रिज शो रूमला लागून येथे एकच चायनीज भाजीचे दुकान होते. मात्र कोरोनाच्या लाटेनंतर हळूहळू या चायनीज ड्रॅगनने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सध्या शिवाजी मंदिरसमोरील मुख्य रस्त्यापासून ते जे. के. सावंत मार्गावरील मुंबई महापालिकेच्या वाहनतळापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा केवळ भाजीविक्रेतेच दिसतात. कहर म्हणजे, आता या विक्रेत्या आणि फेरीवाल्यांनी दोन्ही बाजूंचे फूटपाथही गिळंकृत केले आहेत. पहाटे तीन-चार वाजल्यापासून भाज्यांचे ट्रक लोडिंगसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असतात. या ट्रकचे चालक-वाहक अर्वाच्य भाषेत बोलतात. एकमेकांना शिवीगाळ करतात. तसेच काही चालक तर ट्रकमध्ये मोठमोठय़ाने गाणी लावतात. हॉर्न वाजवतात. खाली जाब विचारायला उतरलो तर हे लोक आम्हालाच दमदाटी करतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
डास, उंदीर, घुशींमुळे हैराण
भाजीविक्रेते भाज्यांचा कचरा आणि इतर साहित्य असेच रस्त्यांवर टाकतात. इमारतींच्या खाली कुजलेल्या भाज्यांचा उग्र वास येत असतो. त्यामुळे डास, उंदीर आणि घुशींचा उपद्रवही सोसावा लागत आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागाचे कार्यालय खांडके बिल्डिंगच्या मागील बाजूस आहे; पण रस्त्यावरील या कचऱयाचे महापालिकेला काहीच देणेघेणे नाही, असेही स्थानिकांनी सांगितले.
वाहतूक पोलीसही ट्रकवर कारवाई करीत नाही
पूर्वी या मार्गावर सम-विषम पार्किंगची सोय होती. पण महापालिकेचे वाहनतळ झाल्यापासून रस्त्यावरील पार्किंग बंद करण्यात आली आहे. आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाश्यांनी स्वतःची टू-व्हीलर, चारचाकी वाहने रस्त्यांवर पार्क केली की वाहतूक पोलीस लगेचच दंड ठोठावतात. मात्र रात्रीपासून पार उजाडेपर्यंत हे ट्रकचालक आपली वाहने रस्त्यालगत लावतात. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.
आतापर्यंत अनेक तक्रारी केल्या, मात्र दखलच घेतली नाही
खांडके बिल्डिंग चाळ क्रमांक 11 आणि 12 मधील रहिवाश्यांनी या भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांविरोधात शिवाजी पार्क पोलीस, पोलीस उपायुक्त परिमंडळ, माहीम; परिवहन आयुक्त, मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र आजतागायत कोणीही या तक्रारींची दखलच घेतलेली नाही. खांडके बिल्डिंग शेजारील राऊतवाडीच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू आहे. यापूर्वी हे फेरीवाले राऊतवाडीत आपला व्यवसाय करीत होते; पण जेव्हापासून राऊतवाडीचा परिसर बंद करण्यात आला तेव्हापासून बाहेर जे. के. सावंत मार्गाचा ताबा या भाजीविव्रेते आणि फेरीवाल्यांनी घेतला आहे.
…तर आंदोलन करू – स्थानिकांचा इशारा
खांडके बिल्डिंगमधील नागरिकांनी जे. के. सावंत मार्गावरील भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांच्या त्रासातून आमची सुटका करण्याची मागणी मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या फेरीवाल्यांमुळे शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्गाला फारच त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर या फेरीवाल्यांचा बंदोबस्त न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

























































