
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना शासन आणि प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मालवणमध्ये राज्यासह देश, परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मालवण किनारपट्टीवरील सर्व प्रकारचे जलक्रीडा प्रकार, साहसी पर्यटन, नौकाविहार तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या कोरोना रोखण्यासाठी झालेल्या आढावा बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
तहसीलदार यांच्या दालनात आमदार नाईक यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आरोग्य, पर्यटन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आदी यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यासह शिवसेना पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, संमेश परब, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, प्रवीण रेवंडकर आदी उपस्थित होते. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत कोरोनाची लक्षणे असणारा एकही रुग्ण मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या तपासणीत आढळलेला नाही. मात्र, आरोग्य यंत्रणेकडून सर्वप्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गरज भासल्यास शासकीय विश्रामगृह येथे व्यवस्था केली जाणार आहे, असे तहसीलदार पाटणे यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’चा फैलाव होऊ नये, यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, यासाठी परराज्यातील तसेच अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या बंद करायला पाहिजेत. मात्र, कोरोनाची लक्षणे आढळून न आल्यास पर्यटक किंवा रुग्णांची हेळसांड करू नका, अशा सूचना आमदार नाईक यांनी प्रशासनाला दिल्या. गोवा राज्यातून स्कुबा डायव्हिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्याना बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून विदेशी पर्यटकांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. पर्यटकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तहसीलदार पाटणे यांनी बंदर विभागाला सर्व प्रकारचे जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात जलक्रीडा प्रकल्प, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग, किल्ला होडी प्रवासी वाहतूक, नौका विहार आदी पर्यटन व्यवसाय पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, असे आदेशात म्हटले आहे. शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून पर्यटन व्यवसाय सुरू राहिल्यास संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही तहसीलदार पाटणे यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवबाग गावातील जलक्रीडा प्रकल्प, जलक्रीडा व्यवसाय याबरोबर हॉटेल, रिसॉर्टही 22 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरपंच जानव्ही खोबरेकर यांनी दिले आहेत. 16 ते 22 मार्च या कालावधीत पर्यटक आढळून आल्यास त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली जाईल, असेही सरपंच खोबरेकर यांनी स्पष्ट केले आहे.



























































