कालिना कॅम्पस परिसरातील झोपडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस परिसरातील झोपडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाने पायाभूत सुविधा नियोजन अंमलबजावणी व देखभाल विभागाला दिले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी सिनेट सदस्यांनी या झोपडय़ावर कारवाई करून त्या तातडीने निष्कासित करण्याची मागणी केली होती.

कलिना परिसर येथील हयात प्रवेश द्वारा शेजारील क्रिकेट मैदानालगत असलेल्या झोपडपट्टीमुळे विद्यापीठाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या झोपडय़ा हटविण्याची मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि शीतल शेठ-देवरुखकर यांनी निवेदनाद्वारे केली होती. या झोपडय़ांमध्ये विद्यापीठात रोजंदारीवर गवत कापण्याचे काम करणारे कामगार राहतात. या कामगारांच्या राहण्याची व्यवस्था अन्यत्र करून विद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या झोपडय़ा हटविण्यात याव्यात, असे युवासेनेचे म्हणणे होते. विद्यापीठ प्रशासनाने युवासेनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.