
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. योगी आदित्यनाथ गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या संपत्तीचा तपशीलही सादर केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे पूर्वी 95.98 लाख रुपयांची संपत्ती होती जी वाढून आता 1 कोटी 54 लाख रुपये इतकी झाली आहे. गेल्या 5 वर्षांत त्यांच्या संपत्तीत 60 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
उमेदवारी अर्ज सादर करत असताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी आपल्यावर एकाही गुन्ह्याची नोंद नसल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी सादर केलेल्या तपशीलामध्ये आपल्याकडे 72 लाख 17 हजार रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
योगी आदित्यनाथ यांनी नवी दिल्लीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संसद भवन शाखेत 25 लाख 99 हजार 171 रुपये ठेवले आहेत. याशिवाय पीएनबी बँकेत 4 लाख 32 हजार 751, 7 लाख 12 हजार 636 रुपयांच्या एफडी ठेवलेल्या आहेत. स्टेट बँकेच्या लखनऊ येथील विधानसभा मार्गावरील शाखेमध्ये योगी आदित्यनाथ यांनी 67 लाख 85 हजार 395 रुपये ठेवलेले आहेत. योगी यांनी 2 लाख 33 हजार रुपयांचे विमा संरक्षणही घेतलेले आहे. गेल्या निवडणुकीवेळी योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्याकडे 2 गाड्या असल्याचं म्हटलं होतं, मात्र यंदा त्यांनी आपल्याकडे एकही गाडी नसल्याचं म्हटलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे 1 लाख रुपये किंमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 82 हजार रुपयांची रायफलही आहे. योगी यांच्या कानातील कुंडलांची किंमत ही 49 हजार रुपये इतकी असून त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षांची माळा ही 20 हजार रुपये किंमतीची आहे.




























































