राहुल गांधींविरोधात ‘फेक न्यूज’ चालवणाऱ्या अँकरच्या अटकेवरून ड्रामा, दोन राज्यांचे पोलीस आमनेसामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांचे वक्तव्य तोडून मोडून दाखवल्याचा आरोप असलेले झी न्यूजचे अँकर रोहित रंजन (Rohit Ranjan) यांच्या अटकेवरून दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. छत्तीसगड पोलीस पहाटेच्या सुमारास रोहित रंजन यांच्या गाझियाबादमधील इंदापूरम भागातील निओ स्कॉर्टिस सोसायटीमध्ये पोहोचले होते. पोलीस दाराबाहेर आल्याचे कळताच रोहित रंजन यांनी ट्विट करत उत्तर प्रदेश पोलिसांकडे मदत मागितली. यानंतर इंदापूरमच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत छत्तीसगड पोलिसांना रोहित रंजन यांच्या अटकेपासून रोखले.

रोहित रंजन यांनी राहुल गांधी यांचे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवले होते. वाद वाढल्यानंतर झी न्यूजकडून याबाबत दिलगिरीही व्यक्त करत माफी मागण्यात आली होती. परंतु या प्रकरणी छत्तीसगडमधील रायपूर येथे देवेंद्र यादव नावाच्या एका व्यक्तीने रोहित रंजन यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी रोहित रंजन यांच्याविरुद्ध कलम 153, 295, 504, 505 (20), 120 (ब), 467, 469 आणि 471 अन्वये गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती रायपूरचे एसपी प्रशांत अग्रवाल यांनी सांगितले. याच गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यासाठी छत्तीसगड पोलीस पहाटेच्या सुमारास रोहित रंजन यांच्या घरी पोहोचली.

सकाळी साडे पाच वाजता छत्तीसगड पोलीस रोहित रंजन यांच्या घरी पोहोचले. घराबाहेर पोलीस पाहून रोहित रंजन यांनी स्थानिक पोलिसांना कोणतीही सूचना न देता छत्तीसगड पोलीस माझ्या घराबाहेर मला अटक करण्यासाठी पोहोचले आहेत. हे कायदेशीर आहे का? असे ट्विट केले. यात त्यांनी योगी आदित्यनाथ, गाझियाबादचे SSP यांना टॅग केले. या ट्विटला रायपूर पोलिसांनी उत्तर दिले आणि पोलिसांना सहकार्य करा व न्यायालयात आपली बाजू मांडा असे म्हटले.

दरम्यान, गाझियाबाद पोलिसांनीही ट्विट करून रोहित रंजन यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर इंदिरापूरम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या परवानगीशिवाय अटक करण्यावरून रायपूर आणि गाझियाबाद पोलिसांमध्ये वाद झाला. या वादावर रायपूर पोलिसांनी माहिती देण्याचा असा कोणताही नियम नाही. आम्ही कोर्टाचे वॉरंट घेऊन पोहोचल्याचे म्हटले. मात्र गाझियाबाद पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेत अँकरचा ताबा घेतला, असेही रायपूर पोलिसांनी सांगितले. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्या स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना बोलवून त्यांना माफ करण्याचे विधान केले होते. हे विधान नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर उदयपूर येथे करण्यात आलेल्या कन्हैय्या लाल हत्याकांडाशी जोडून दाखवण्यात आले होते. याद्वारे राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आला.