
जमिनीच्या वादातून सहा जणांची हत्या झाल्याची भीषण घटना उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे घडली आहे. एका कुटुंबातील माणसाच्या हत्येचा सूड म्हणून दुसऱ्या कुटुंबातील पाच जणांनी हत्या करण्यात आली आहे.
ही घटना देवरिया येथील फतेहपूर गावात घडली आहे. या गावातील माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव आणि सत्य प्रकाश दुबे यांच्या कुटुंबात जमिनीवरून वाद सुरू होते. दुबेंच्या आरोपाप्रमाणे प्रेम यादव यांनी त्यांच्या जमिनीवर ताबा मिळवला होता. तर प्रेम यादवनुसार ही जमीन त्यांचीच होती. सोमवारी प्रेम यादव यांचा मृतदेह त्यांच्या घराबाहेरील गल्लीत आढळला. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. हत्येचा दोषी कोण हे अद्याप समजलं नव्हतं.
पण, प्रेम यादव यांच्या कुटुंबाला दुबेंच्या कुटुंबावर दाट संशय होता. त्यामुळे सूडाच्या भावनेने त्यांच्या कुटुंबाने दुबेंच्या कुटुंबावर हल्ला केला. सकाळची वेळ असल्याने घरी सगळे उपस्थित होते. संतापलेल्या यादव कुटुंबाने लाठ्या काठ्या, धारदार हत्यारं आणि बंदूकांनी त्यांच्या कुटुंबावर वार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. सत्यप्रकाश, त्यांची पत्नी, दोन मुलगी, एक मुलगा यांचा यात मृत्यू झाला असून एक मुलगा अद्याप गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

























































