गोवर-रुबेला लसीकरण मोहीम आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 27 नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 9 महिने ते 15 वर्षांखालील सुमारे 3 कोटी 38लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्यातील सुमारे 95 टक्के बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस सुरक्षित असून पालकांनी आपल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवनाच्या प्रांगणात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होईल. लसीकरणाच्या पहिल्या दोन आठवडय़ांत सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येईल. त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकांद्वारे व बाह्यसंपर्क लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. शेवटच्या दोन आठवडय़ांमध्ये ज्या बालकांचे या मोहिमेत लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

वातावरणातील बदलामुळे साथीच्या रोगांचा प्रसार

हरितगृह वायू निर्माण करणाऱ्या इंधनाचा अतिरिक्त वापर, पृथ्वीचे वाढणारे तापमान, अनियमित पाऊस यामुळे वातावरणातील बदल दिसून येत आहेत. त्याचा परिणाम साथीच्या रोगांच्या प्रसारावर होतो, पण मागील पाच वर्षांत राज्यातील मलेरियाचे प्रमाण कमी होत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधीवरील उत्तरात सांगितले. राज्यातील स्वाइन फ्लू व डेंग्यूबाबत आमदार सुनील शिंदे, सुनील प्रभू, मंगेश कुडाळकर, भरतशेठ गोगावले, सुभाष भोईर, संजय पोतनीस, तृप्ती सावंत, डॉ. सुजीत मिचणेकर, प्रकाश फातर्पेकर, तुकाराम काते आदींनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्यावर डॉ. दीपक सावंत यांनी माहिती दिली.