सरसंघचालकांच्या ‘पापक्षालन’ वक्तव्यावरून गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याची गरज असल्याचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्याने त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भागवत यांच्या विधानाचा ब्राह्मण महासंघाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विधानाचे स्वागत करत ‘इतिहासात झालेल्या चुकांबाबत नुसती माफी मागून चालणार नाही. प्रत्यक्ष व्यवहारात या सगळय़ा वर्गांसंबंधी आपण कशी भूमिका घेतो हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे’, अशी भूमिका मांडली आहे.

‘समाजातील एका मोठय़ा वर्गाला पिढय़ान्पिढय़ा यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जबाबदारी ज्या घटकांकडे आहे त्या घटकांना याची जाणीव व्हायला लागली ही समाधानाची बाब आहे. मात्र, इतिहासात झालेल्या चुकांसाठी केवळ माफी मागून चालणार नाही तर तसे आचरणही असावे. प्रत्यक्ष व्यवहारात या वर्गाबाबत कशी भूमिका घेतली जाते त्यावर साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

भागवत यांनीच पापक्षालन करावे – ब्राह्मण महासंघ

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. भागवत यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. त्यांचा अभ्यास कच्चा दिसतो. पूर्वीच्या काळी ब्राह्मणांनी चुका जरूर केल्या असतील, पण ब्राह्मण समाजातील काहींनी त्यास तेव्हा विरोधही केलेला आहे. तो उल्लेख टाळून सरसकट सर्वच ब्राह्मणांनी पापक्षालन करावे, असे म्हणणे उचित नाही, असे नमूद करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भागवत यांच्यावर पलटवार केला. खरेतर मोहन भागवत यांनी पापक्षालन करण्याची गरज आहे. इथला हिंदू धर्म नराधमांच्या हाती देण्याचे पाप केले जात आहे. देशात जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे. त्यासाठी तुम्हीच पापक्षालन करायला हवे, असे दवे म्हणाले. भागवत यांनी ब्राह्मण समाजाला वेगळे पाडण्याच्या हेतूने हे विधान केल्याचा आरोपही दवे यांनी केला.

भागवत नेमके काय म्हणाले?

आपल्या धर्मशास्त्र्ााला जातीगत विषमता अजिबात मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे ब्राह्मण होतो, हे धर्मशास्त्र्ाात स्पष्ट नमूद केलेले आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्र्ाानुसार 80 ते 90 पिढय़ांपूर्वी हिंदुस्थानात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतर हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्था वाढीस लागली. मधल्या काळात शरमेने मान खाली जावी अशा पद्धतीने आपण आपल्याच लोकांना वागवले. या चुका आपण कबूल करायला हव्यात. पूर्वीच्या चुकांसाठी ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे, असे विधान मोहन भागवत यांनी शुक्रवारी नागपूर येथे केले होते.