ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी कालवश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक मराठी चित्रपटात लक्षवेधी भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. पुण्यामधील त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा अॅड. रुचिर कुलकर्णी, सून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि नातू अभिनेता विराजस कुलकर्णी असा परिवार आहे.

जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. बहुतांश चित्रपटातील त्यांच्या सरपंच, पाटील किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.