शिवसेनेचा विजय निश्चित, काँग्रेसची वाट मात्र बिकट! विधान परिषद निवडणूक पालिकेत पडघम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱया सहा जागांची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार असून यात मुंबईतील दोन जागांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेत 97 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचा विजय निश्चित असला तरी यावेळी काँग्रेसची वाट मात्र बिकट झाली आहे.

मागील निवडणुकीत महानगरपालिकेतून विधान परिषदेवर शिवसेनेकडून रामदास कदम आणि काँग्रेसकडून भाई जगताप यांची बहुमताने निवड झाली होती. त्यावेळी 34 नगरसेवक असलेल्या भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा पराभव झाला होता. मात्र 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे काँग्रेसचा मार्ग मात्र खडतर झाला आहे. महानगपालिकेतील संख्याबळ लक्षात घेता थेट विजयासाठी पहिल्या पसंतीची 77 मतांची आवश्यकता आहे. पक्षीय बलाबल लक्षात घेता शिवसेनेचा विजय निश्चित आहे. भाजपचे 83 नगरसेवक असल्याने मते फुटली नाही तर काठावर पास होण्याइतपत मतांची गोळाबेरीज होऊ शकते. काँग्रेसची वाट मात्र यावेळी कमी झालेल्या संख्याबळामुळे बिकट झाली आहे. दोन्ही पक्षांकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. नव्या चेहऱयांना संधी मिळणार की विद्यमान उमेदवारच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे होणार मतदान

पालिकेत निवडून आलेल्या एकूण 227 सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. दोन जागांसाठी होणाऱया निवडणुकीत प्रत्येक सदस्याला पहिल्या व दुसऱया पसंतीचे मत देण्याचा अधिकार असतो. मात्र पहिल्या पसंतीची 77 मते मिळाल्यास पहिल्याच फेरीत विजय निश्चित होतो. काँग्रेसला शिवसेनेची शिल्लक 21 व राष्ट्रवादीची आठ मते मिळवली तरी त्यांचे घोडे  58 वरच अडणार आहे. अतिरिक्त मते मिळवण्यासाठी काँग्रेस काय रणनीती आखणार याकडे लक्ष लागले आहे.

भाजपकडून चित्रा वाघ?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून चित्रा वाघ यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चित्रा वाघ या राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. याशिवाय आणखी बरेच उत्सुक असल्याने कोणाला संधी मिळणार याबद्दल कुतूहल  आहे.

सध्याचे संख्याबळ

  • शिवसेना  ः    97
  • भाजप ः 83
  • काँग्रेस ः 29
  • राष्ट्रवादी  ः    8
  • समाजवादी      ः    6
  • मनसे  ः 1
  • एमआयएम      ः    2
  • एकूण  ः 227

(एक प्रकरण न्यायालयात)