
सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रावणाच्या रुपात दाखवणारं पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. हे पोस्टर भाजप समर्थकांकडून बनवण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
”भाजपच्या हीन पातळीवरील राजकारणाचा निषेध. 9 वर्षात भाजप ने देशात रावणसारखी सत्ता चालवली. ज्याप्रमाणे रावणाने बहरुपी बनून सीता मातेचे अपहरण केले होते आणि त्यांना त्रास दिला, त्याचप्रमाणे भाजपने सुद्धा विकासाचे सोंग घेऊन बहरूपी बनून देशाचं वाटोळं केलं आहे. भाजपने देशात रावणराज निर्माण केले. महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण करणाऱ्या भाजपच्या खासदाराला पाठीशी घातले. भाजप सत्तेत असलेल्या मणिपूर मध्ये तेथील आया बहिणींची धिंड काढली जाते पण तिकडे दुर्लक्ष केले जाते. कोणताही भाजप नेता याबाबत बोलत नाही. बिल्कीस बानो वर बलात्कार करणाऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांचा सत्कार केला जातो. हे रावणराज नाही तर काय आहे?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
”रावणराज करणाऱ्या भाजपला स्वतःची लंका जळत असल्याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजपने आमचे नेते राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी हीन पातळीवरील राजकारण सुरू केले आहे”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सोशल मीडियावरील पोस्टरवरून मुंबई प्रदेश काँग्रेसकडून भाजपविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने-सामने आले. या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपविरोधात यावेळी प्रचंड घोषणा देण्यात आल्या.
























































