
शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही, तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य सरकारने पावले उचललेली आहेत. बाजारपेठेचा कल ओळखून शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
‘विकेल ते पिकेल’ अभियान, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला.
शेतकरी राबतात
शेतकरी राबतात म्हणून जगाला अन्न मिळते. पिकाला मातीमोल भाव मिळत असेल तर शेतकरी कसा जगणार, असा सवाल करत ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
10 हजार कोटींची खरेदी
कोरोनाच्या संकटकाळातही महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजने अंतर्गत 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. 10 हजार कोटी रुपयांच्या शेतमालाची खरेदी सरकारने केली आहे. शेतकरी बांधवांसाठी शेतकरी सन्मान कक्षाची स्थापना राज्यभरात करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.





























































