
शासनाच्या वाळूडेपोला विशेष ग्रामसभेने विरोध दाखवला आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया थांबवावी अन्यथा छातीवर गोळ्या झेलू; पण वाळूचा एक कणही उचलू देणार नाही, असा आक्रमक इशारा मुळा नदीकाठच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
मुळा नदीकाठच्या निभारी, अंमळनेर, शिरेगाव, करजगाव, पानेगाव, मांजरी, तिळापूर, वांजूळपोही, गोणेगाव, इमामपूर, खुपटी, खेडले परमानंद येथील ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन वाळूडेपोला विरोध दर्शविला आहे. यामुळे पालकमंत्री विखे-पाटील यांच्या धोरणाला त्यांच्याच जिल्ह्यात खो बसला आहे.
शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार वाळूडेपोनिर्मिती धोरणानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाळूडेपोसाठी निविदा प्रसिद्ध होताच मुळा नदीकाठच्या गावकऱयांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून शासनाच्या वाळूडेपोस विरोध दाखवला आहे.
मुळा, प्रवरा नदीतील काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मदतीने वाळू तस्करांनी वाळूचा वारेमाप उपसा करून परिसर उजाड केला आहे. पाणी पाझर होत नाही त्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांना पाणीप्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रसंगी छातीवर गोळ्या झेलू; पण वाळूचा एक खडाही उचलू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
मुळा नदीकाठच्या ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन वाळूडेपोला विरोध केला आहे, या ठरावाच्या प्रति शासनास दिल्या आहेत. याचा विचार न झाल्यास 11 मेपासून साखळी उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
























































