विनाशकारी रिफायनरी बारसूत येऊ देणार नाही! विनायक राऊत यांचा इशारा

कोकणच्या निसर्गाची राखरांगोळी करणारा विनाशकारी प्रस्तावित बारसू–सोलगाव रिफायनरी प्रकल्प बारसूत येऊच देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी आज दिला. रिफायनरी प्रकल्पविरोधकांच्या आझाद मैदान येथील आंदोलनात मार्गदर्शन करताना राऊत बोलत होते.

विनाशकारी बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असतानाही ‘मिंधे’ सरकारकडून कधी पोलिसी बळाचा वापर करून तर कधी आंदोलकांची दिशाभूल करून हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे.‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पा’मुळे केवळ बारसू, सोलगावमध्येच नाहीतर पंचक्रोशी आणि रत्नागिरी-कोकणाच्या निसर्गावर प्रचंड हानीकारक परिणाम होणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात विनाशकारी रिफायनरी प्रकल्पविरोधकांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची आज विनायक राऊत यांनी भेट घेऊन आपुलकीने संवाद साधून मार्गदर्शन केले. कोकणात येऊ पाहणारा विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कदापिही होऊ देणार नाही आणि रिफायनरीविरोधी संघटनेसोबत कायम हक्काने उभे राहणार असल्याचा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. या आंदोलनात रिफायनरीविरोधी आंदोलनात कोकणातील मुंबईवासीय, पर्यावरणप्रेमी आणि रिफायनरीविरोधी मोठय़ा प्रमाणात उपस्थित आहेत. ‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द,’ असा निर्धार करून हे आंदोलन सुरू आहे.