
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने बाकी आहेत. निवडणुकांच्या तारखांची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर एक असा मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखांची यादी देण्यात आली आहे. ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल माध्यमांवर वेगाने शेअर होत आहे. परंतु हा मेसेज चुकीचा असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
समाजमाध्यमांवर विशेषतः व्हॉट्सअपवर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याचे प्रसारित वृत्त पूर्णतः चुकीचे. भारत निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत #लोकसभा निवडणुकांबाबतचा कार्यक्रम घोषित केलेला नाही- राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाचे स्पष्टीकरण. pic.twitter.com/KR9zQXgfUT
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 29, 2019
व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील मतदान 7 एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 12 एप्रिलला होईल असे म्हटले आहे. परंतु निवडणूक आयोगाने अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याने स्पष्ट झाले आहे. यासाठी निवडणूक आयोगाने एक पत्रक काढत व्हायरल होणारे मेसेज चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
समाजमाध्यमांवर विशेषतः व्हॉट्सअपवर लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याचे प्रसारित वृत्त पूर्णतः चुकीचे आहे. निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत लोकसभा निवडणुकांबाबतचा कार्यक्रम घोषित केलेला नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहे.
कसा ओळखाल फेक मेसेज?
– व्हायरल होणाऱ्या या फेक मेसेजमध्ये नावांचे स्पेलिंग चुकीचे आहेत. जसे की ‘Dadra and Nagar Haveli’ च्या जागी ‘Badranagar Habeli’ असे लिहिण्यात आले आहे, तर ‘Lakshadweep’ च्या जागी ‘Laxyadip’ लिहिण्यात आले आहे.
– तसेच या मेसेजमध्ये निवडणुकांच्या ज्या तारखा देण्यात आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. पडताळणीदरम्यान 2019 लोकसभा निवडणुकीसाठी देण्यात आलेल्या तारखा प्रत्यक्षात 2014 ला झालेल्या निवडणुकीच्या असल्याचे दिसून आले.
कारवाई होणार…
दरम्यान, असे फेक मेसेज व्हायरल करणाऱ्या ग्रुपवर किंवा व्यक्तीवर किंवा संस्थांवर कारवाई करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना त्याची पूर्ण पडताळणी करून घ्या.
























































