
सामना प्रतिनिधी । मुंबई
वादग्रस्त ठरलेल्या तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. सांस्कृतिक खात्याने यासंदर्भातील जीआर नुकताच काढला आहे. त्यामुळे आता विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा तमाशा कलावंतांनी व्यक्त केली आहे.
विठाबाईंच्या गौरवार्थ 2012 सालापासून राज्य सरकारच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. पहिला पुरस्कार विठाबाईंच्या समकालीन कांताबाई सातारकर यांना प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक खात्याने 9 नोव्हेंबर 2015 रोजी जीवनगौरव पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना केली. परंतु ही समिती वादग्रस्त ठरली. समिती बदलण्याचीच मागी करण्यात आली. त्याकडे सांस्कृतिक खात्याने दुर्लक्ष केले होते. मात्र आता 29 नोव्हेंबर रोजी सरकारने जीआर काढून समितीची पुनर्रचना केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामध्ये सांस्कृतिक खात्याचे प्रधान सचिव आणि संचालक या सदस्यांव्यतिरिक्त दत्तोबा फुलसुंदर, नारायणगाव, लता पुणेकर, पुणे, जयमाला इनामदार, पुणे, प्रकाश खांडगे- मुंबई, भीमराव तातोराम गोपाळ, धुळे, विद्याधर जिंतीकर, पुणे, श्यामल गरुड, मुंबई या अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे.
वशिलेबाजीचा आरोप
विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा वशिलेबाजीने दिला जातो, असा आरोप विठाबाईंच्या कन्या मालती इनामदार यांनी करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर संबंधित समितीची पुनर्रचना करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्यास सांस्कृतिक खात्याने विलंब केला.

























































