
मणिपूरच्या कांगपोकपी जिह्यात पुन्हा हिंसाचार उफाळून आला. कुकी समुदाय असलेल्या एका गावातील लोकांनी शनिवारी रात्री उशिरा जाळपोळ करत रस्ते रोखून धरले तसेच गाडय़ांवर दगडफेक करण्यात आली. या जमावाला हटविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचे अनेक नळकांडे पह्डले.
प्राप्त माहितीनुसार, खोलेन गावातील 7 कुकी ग्रामस्थांना सीआरपीएफने अटक केली होती. त्याचा विरोध करत ग्रामस्थांनी इंफाळ-दिमापूर महामार्ग रोखला. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले. काही वाहनांवर दगडफेक केली. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कुकी समुदायाने सीआरपीएफने केलेल्या कारवाईचा निषेध केला. कुकी महिलांच्या हत्येसाठी दोषी असलेल्यांना पोलिसांनी अटक केली नाही. मात्र, स्थानिकांनाच अटक केली. आम्ही शांततेने निदर्शने करत होतो, असा दावा कुकी समुदायाची प्रमुख संघटना ‘कुकी इनपी मणिपूर’ने केला आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी अटक केलेल्या 7 ग्रामस्थांना सोडून देण्यात आले.

























































