शिवसेनेच्या नावाने मतदार नोंदणी कार्यालयाचा खोडसाळपणा; अस्तित्वात नसलेल्या पक्षाला दिले बैठकीचे निमंत्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम सर्वत्र सुरू आहे. यासंदर्भात बोलविण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीस चक्क अस्तित्वात नसलेल्या शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावाने निमंत्रण देण्याचा खोडसाळपणा कांदिवली पूर्व विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयाकडून करण्यात आला. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधितांनी दिलगिरी व्यक्त करत अखेर ही चूक सुधारत तसे पत्र जारी केले आहे.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत 160- कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात 17 नोव्हेंबर रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),  कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. राजकीय पक्षांच्या यादीत शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असेही नमूद करण्यात आले होते. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी संबंधित अधिकाऱयांशी तत्काळ संपर्क साधत शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) या नावाचा पक्षच अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आणून देत जाब विचारला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना या नावांना मान्यता दिलेली आहे. त्यानंतरही शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असा उल्लेख करून त्या नावाने पत्रव्यवहार करणे चुकीचे असल्याचे अनिल देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर संबंधित अधिकाऱयांनी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रामध्ये शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), असे अनवधानाने नमूद करण्यात आल्याचे मान्य करत तत्काळ बाळासाहेबांची शिवसेना अशी दुरुस्ती करत चूक सुधारली आणि दिलगिरी व्यक्त केली.

शिवसेना पक्षासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या नावाला आणि पक्ष चिन्हाला मान्यता दिलेली आहे त्यामध्ये कोणतीही गफलत केली जाऊ नये. मतदार तसेच सर्वसामान्य नागरिकांत शिवसेना पक्षाच्या नावा संदर्भात संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव, खासदार अनिल देसाई म्हणाले.