
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने हिंदुस्थानात संचारबंदी लागू केली असून सर्वत्र लोकं घरात बंद आहेत. अशावेळी हातावर पोट असलेल्या अनेकांना गंभीर परिस्थितीला सामोरे जात असून वाडा तालुक्यातील कुडूस येथे जवळपास १०३ नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सगळे कामगार ओडिसा राज्यातील असून वाडा तहसिलदारांनी या कामगारांची तातडीने दखल घेऊन इस्कॉनतर्फे जेवणाची व्यवस्था केली आहे.
देशात संचारबंदी लागू झाल्याने सर्वत्र हाहाकार माजला असून जनजीवन ठप्प झाले आहे. सर्वत्र रोजगार बुडाले असल्याने हातावर पोट असलेल्या लोकांचे अक्षरश: हाल सुरू झाले आहेत. तालुक्यातील कुडूस गावात मल्याणपाडा येथे सुमारे १०३ नाका कामगार वस्तीने राहतात. कामगारांच्या येथे झोपड्या असून तालुक्यात मिळेल तेथे रोजचं काम करून हे कामगार निवासासाठी येथे येतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंदी झाली त्यात अनेकजण स्थलांतरित कामगार आपल्या गावाला परत गेले, पण अनेक कामगार आजही अडकून पडले असून आता या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुडूस येथे असलेल्या या कामगारांची खरंतर स्थानिक प्रशासनाकडे माहिती असणे गरजेचे असतांना या कामगारांनी स्वतः आपली व्यथा मांडली तर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी वाडा तहसिलदार उद्धव कदम यांना माहिती देवून या कामगारांच्या समस्येवर उपाय करण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार तहसीलदार यांनी या कामगारांची भेट घेऊन आपल्या गावी जाण्याची परवानगी नसल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून प्रयत्न करीत गोवर्धन व्हिलेज येथील इस्कॉन मार्फत जेवणाची व्यवस्था करून दिली.
पुढील दिवसांत अशाच प्रकारे त्यांच्या जेवणाची व्यवस्था होणार असून या कामगारांची आरोग्य चाचणी देखील होणार असल्याची माहिती वाडा प्रांत अधिकारी अर्चना कदम यांनी दिली. यावेळी वाडा गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांसोबत इस्कॉनचे औदार्य चैतन्य दास ,प्राणवल्लभ आदी उपस्थित होते.


























































