
श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांचा तपास अद्याप सुरू आहे. या हत्येसंबंधीचे अनेक भयंकर खुलासे दिवसेंदिवस उघड होताना दिसत आहेत. दिल्लीच्या महरौली पोलिसांना अद्याप या हत्येचा कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही, ज्यावरून श्रद्धाची हत्या झाल्याची पुष्टी होऊ शकेल. पोलीस तिच्या मृतदेहाचे अवशेष गोळा करण्यासाठी आफताबने सांगितलेल्या ठिकाणांवर तपास करत आहे.
दरम्यान, मृत्युवेळी श्रद्धा गरोदर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंगळवारी पोलिसांना एक माकडहाडाचा मोठा भाग सापडला आहे. हा भाग श्रद्धाच्या मृतदेहाचा असावा, असा अंदाज असून त्याची तपासणी केली जात आहे. दिल्ली पोलिसांना श्रद्धा तिच्या हत्येवेळी गर्भवती असल्याचा संशय आहे. इतक्या वेळानंतर सापडलेल्या हाडांच्या मदतीने तिची गर्भधारणा निश्चित करणं कठीण आहे. घरी किंवा तिच्या मोबाईलवर सापडलेल्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरूनच याची माहिती कळू शकेल की ती खरोखर गर्भवती होती किंवा नाही.
अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील नवनवीन गोष्टी पोलीस तपासातून पुढे येत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर नराधम आफताब पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. क्रूरतेचा कळस म्हणजे, श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये असताना आफताब त्याच फ्लॅटमध्ये दुसऱ्या मुलीसोबत रोमान्स करत होता. आफताबने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
वसईच्या श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकल्याचा प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला. या घटनेमुळे अवघा देश हळहळला. आता याप्रकरणी पोलीस तपासाला वेग आला असून नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.
श्रद्धाच्या हत्येनंतरही काही घडलेच नाही अशा थाटात आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहायचा. श्रद्धाच्या हत्येनंतर त्याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ज्या डेटिंग अॅपवरून श्रद्धा आणि आफताबची ओळख झाली त्याच अॅपवरून त्याची दुसऱ्या मुलीसोबत ओळख झाली होती. श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये असताना त्याच रूममध्ये आफताब दुसऱ्या मुलीसोबत संबंध ठेवत होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. आफताब आतापर्यंत या डेटिंग अॅपवरून किती मुलींना भेटला, श्रद्धाच्या हत्येचे कारण यापैकी एखादी मुलगी तर नाही ना या दृष्टीनेदेखील पोलीस तपास सुरू आहे.

























































