भूगर्भातील पाण्याची घटती पातळी चिंताजनक, पाण्यासाठी शेतकरी शोधू लागले भूगर्भाची खोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अहमदपूर

गेल्या तीन चार वर्षापासून पुरेसा पाऊस नसल्याने पाण्यासाठी शेतकऱ्याच्या दाही दिशा फिरून झाल्यानंतर दुष्काळाने व्याकूळ झालेल्या शेतकरी आता पाण्यासाठी विहीर उपसा करून भूगर्भाची खोली धुंडाळताना दिसत आहे. क्रेनच्या सहाय्याने दिवसाला 2000 ते 2500 भाडे देऊन विहीरीचा उपसा शेतकरी करत आहे. तसेच बोअरवेल घेऊन कूपनलिका किंवा विहीरीत आडवे बोअर घेऊन पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्याचा आटापिटा सुरू आहे पावसाचे घटते प्रमाण, लहरीपणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

उन्हाच्या कडाक्यामुळे भूजल पातळी खालावल्याने ग्रामीण भागात पाण्याचा शोध घेण्यासाठी गावोगाव बोअरवेलच्या गाड्या धावू लागल्या आहेत. कूपनलिका घेऊनही पाणी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत तसेच जनावरासह, माणसांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही तसेच शेतपिकाची होरपळ पाण्याअभावी होवू लागल्याने शेतकरी पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत.

यावर्षी मार्च महिन्यापासूनच उष्णतेचा पारा वाढायला लागला वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील विहिरीची पातळी खालावली असून नदी नाल्याचे, तसेच तलाव पात्रही कोरडे पडू लागले आहेत. परिणामी गाव शिवारात जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. हीच परिस्थिती चाऱ्याची झाली असून वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्याजवळ जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा नाही. त्यामुळे जनावरांना द्यावे तरी काय या चिंतेने तालुक्यातील शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

बहुतांश गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेली असून अनेक ठिकाणच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांना आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नद्या, नाले, तलाव कोरडे पडले आहेत त्यामूळे पाण्याची समस्या अधिकच बिकट व्हायला लागली आहे. पाण्याचे साठे संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.