
सामना प्रतिनिधी । लातूर
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. कासार बालकुंदा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. गावाला सर्वात मोठे तलाव असून आजपर्यंत बऱ्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये तलावाचे पाणी गावाला पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जात होते. तलावांमध्ये भरपूर पाणी 40% शिल्लक आहे. तलावातून पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइनची व्यवस्था असून देखील ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
तलावाच्या पाण्यावर ती पूर्ण आठ ते दहा महिने संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होईल एवढे पाणी असून देखील वेळे वरती पाणी उपलब्ध होत असल्याने गावकऱ्यांकडुन संताप व्यक्त केला जात आहे. चौकाचौकात पाण्याचे मोठे टाकी उभी केली आहे परंतु त्यामध्ये देखील पाणी वेळेवर सोडत नसल्याने एक ते दोन घागरीसाठी महिला एकमेकांना भांडण करायला लागली आहेत. दोन महिने झाले तलावावर मोटर बसवून पाणी पुरवठा केला जाईल असे ग्रामपंचायत कडून सांगितले जात आहे.
येथे पाणी नाही मिळाल्यास गावच्या परिसरातील शेतामधून विहिरीतून उतरून पाणी आणावे लागत आहे. परंतु विहिरीचे तळ गाठल्याने त्यामध्ये उतरावे कशी व पाणी आणावे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. तलावामधून गावाला दर पाणीपुरवठा केला तरी दररोज पाणी नळाला येण्यास मदत होणार आहे. नागरिकांमध्ये तलावातून पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी केली जात आहे.
तलावावर मोटर बसविण्यासाठी सांगितलेला असून व राहिलेली पाणीपट्टी भरलेली आहे लवकरच तलावातून पाणीपुरवठा होईल अशी माहिती ग्रामसेवक राजेंद्र धर्मशेट्टी यांनी दिली. तसेच तलावातून आलेली पाईपलाईन फुटलेली असून ती दुरुस्त करून पाणीपुरवठा केले जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

























































