
अफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर तालिबानने आता आपले विखारी दात दाखवायला सुरुवात केली आहे. तालिबानची नजर आता कश्मीरवर आहे. हिंदुस्थानातीलच नव्हे तर कुठल्याही देशातील मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे वक्तव्य तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने केले आहे.
कश्मीरचा मुद्दा हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील अंतर्गत बाब आहे. त्यांनी यासाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये. तालिबानला शेजारील देशांशी संबंध हवे आहेत, असे तालिबानचा नेता शेख मोहम्मद अब्बास स्टानिकझई याने तीन दिवसांपूर्वी म्हटले होते. परंतु तालिबानचा खरा चेहरा आता उघड होत आहे.
मुल्ला बरादरकडे जाणार नेतृत्व
तालिबानकडून लवकरच सरकार स्थापनेची घोषणा होणार असून मुल्ला बरादर हा राष्ट्रपती होण्याची दाट शक्यता आहे. बरादर हा तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे नेतृत्व करतो. बरादरबरोबरच मुल्ला मोहम्मद याकूबकडेही महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. तालिबानचा म्होरक्या मोहम्मद अब्बास स्टानिकझईलाही हा सुप्रीम लिडर म्हणून काम पाहील, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
तालिबानविरोधकांना आश्रय दिला तर महागात पडेल
तालिबानविरोधकांना हिंदुस्थानने आश्रय दिला तर महागात पडेल, अशी धमकी तालिबानी नेता गुलबुद्दीन हेकमत्यारने दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही दर्पोक्ती केली. अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांना कश्मीरमध्ये रस नाही. त्यामुळे हिंदुस्थानने चिंता करू नये. पण तालिबानविरोधकांना आश्रय देऊ नये. गेल्या चार दशकांतील चुका हिंदुस्थानने दुरुस्त कराव्यात. यापूर्वी सोवियत युनियन आणि अमेरिकेच्या हल्ल्याचे समर्थन हिंदुस्थानने केले होते, असे हेकमत्यार म्हणाले.

























































