मुंबईत दिवसभर धुवाधार, दोन दिवस मुसळधार, कामाशिवाय घराबाहेर पडू नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम होता. काल सायंकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून जोरदारपणे बरसायला सुरुवात केली. आज दिवसभर पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

मुंबईत गेल्या आठवडय़ात सुरू झालेल्या पावसाने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग तिसऱ्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. जोरदार पावसामुळे काही सखल भागांत पाणी साचल्याचे प्रकार घडले. यामध्ये किंग्ज सर्कल, वडाळा, चेंबूर शेल कॉलनी, अँटॉप हिल, विक्रोळी, कुर्ल्याच्या काही भागात, अंधेरी सब वे या ठिकाणी पाणी साचले. मात्र पालिकेने या ठिकाणी बसवलेल्या पंपांमुळे पाण्याचा निचरा वेगाने झाला. परंतु जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. तर शीव स्थानकासह काही ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. जोरदार पावसामुळे शहरात 5 ठिकाणी, पूर्व उपनगरात 5 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात 2 ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. तर शहरात 5, पूर्व उपनगरात 8 आणि पश्चिम उपनगरात 12 अशा 25 ठिकाणी झाडे-फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. मात्र या घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

असा झाला पाऊस

मुंबई शहर 93.80 मि.मी.
पूर्व उपनगर 110.56 मि.मी.
पश्चिम उपनगर 122.53 मि.मी.

हे ‘बेस्ट’ मार्ग कळवले

‘बेस्ट’ प्रशासनाकडून गाडय़ांच्या मार्गात बदल करण्यात आले. यामध्ये शीव रोड नंबर 24, साधना विद्यालय येथे पाणी साचल्याने येथून बस मार्ग 7 मर्या., 22 मर्या., 25 मर्या., ए-25, 27, 176, 302, 312, 341, ए-341, 411 आदी बस मार्ग सायन येथील रोड क्र. 3 मार्गे कळवण्यात आले. तर शेल कॉलनी, चेंबूर येथे बस मार्ग 355 मर्यादित, ए-357 क 360 या बसेस चेंबूर नाका, आचार्य उद्यान, आंबेडकर उद्यान मार्गे कळवण्यात आल्या. महेश्वरी उद्यान येथे बस मार्ग ए-5, 7 मर्या., 8 मर्या., 9, सी-10, 11 मर्या., ए-19, ए-21, 22 मर्या, ए-25, 63, 66, 67, ए-85, ए-92, 169, ए-171, 351, सी-305, 354, ए-357, ए-385, ए-368, 411, सी-521 या बसेस माटुंगा मार्गे कळवण्यात आल्या.

झाड पडून एक जखमी

मुलुंड पश्चिम येथे मॉण्टी प्लाझा टॉवरसमोर झाड पडून एक जण जखमी झाला. राजकुमार यादव असे जखमीचे नाव आहे. शीव रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शिवाय विक्रोळी, पंचशील नगर, साई प्रसाद सोसायटी येथे एक झाड पडल्याने घराची भिंत कोसळली. हे घर आधीच खाली करण्यात आले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना झालेली नाही.