चर्चा तर होणारच..! चक्क उपोषण मंडपातच ‘त्याला’ हळद लागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अमरावती

लग्न कुणी कुठे करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कुणी सर्वोच्च बर्फ शिखरावर, कुणी विमानात, तर कुणी महासागराच्या तळात जाऊन लग्नाच्या रेशीमगाठी बांधतात. मात्र, अमरावतीत यापेक्षाही एक अनोखा विवाह सोहळा शुक्रवारी रंगणार आहे. चक्क उपोषणाच्या मंडपातच वीज कर्मचारी विवाहबंधनात अडकणार असून उपोषणकर्ते अन्य वीज कर्मचारी या विवाहातील वऱ्हाडी राहणार आहेत. गुरुवारी या लग्नाची हळदही लागली आणि ती देखील चक्क उपोषणाच्या मंडपात.

महावितरण प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेमध्ये कर्मचा-यांवर अन्याय झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वात 9 जुलैपासून अमरावती येथील महावितरण कार्यालयासमोर 7 उपोषणकर्त्याचं उपोषण सुरू आहे. या उपोषणामध्ये निखिल अरुण तिखे हा वीज कर्मचारी सुद्धा सहभागी असून त्याचा विवाह 19 जुलै शुक्रवारी ठरला आहे. मात्र उपोषण लांबल्यामुळे त्याला घरी जाता येणार नसल्याने उपोषण मंडपात गुरुवारी सकाळी हळद, लग्न असा सोपस्कार पार पाडण्याचा निर्णय निखिल यांचा सह तिखे परिवाराने घेतला.

गुरुवारी सनई चौघडा सह उपोषण मंडपातच निखिलला त्याच्या परिवार व मित्रांनी हळद लावली. निखिल यांची होणारी पत्नी पूजा लंगडे यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही सुद्धा या लग्नाला संमती दर्शविली. मात्र निखिलच्या कुटुंबियांनी महावितरणच्या या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी उपोषणकर्त्यांनी खास निमंत्रण पत्रिका तयार केली असून त्यामध्ये मुख्य अभियंता, उप महाव्यवस्थापक, झोन कार्यालय यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा साजरा होणार आहे. तर, जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते, शासकीय अधिकारी,पोलीस आयुक्त यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे.