
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘ब्रेक द चेन’ अभियानांतर्गत राज्य शासनाने पुकारलेल्या विकेंड लॉकडाऊनला शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाला हरविण्यासाठी जनतेनेही लॉकडाऊन पाळत घरी बसणेच पसंत केल्याचे सर्वत्र दिसून येत होते. कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूर या शहरांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून येत होता. सर्वच ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद होत्या. पोलिसांकडून चौकाचौकांत नाकाबंदी करून अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती.
कोल्हापूर जिल्ह्यात नीरव शांतता
राज्य सरकारने लागू केलेल्या पहिल्याच विकेंड लॉकडाऊनला शुक्रवारी रात्री आठनंतर संपूर्ण जिल्हा पुन्हा एकदा ठप्प झाला. शनिवारी सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार दिवसभर पूर्णतः बंद राहिल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.
जिल्ह्यात चौकाचौकांत पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून, अनावश्यक फिरणाऱ्यांना चाप लावून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. नेहमी गजबजलेला महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शिंगोशी मार्केट, राजारामपुरी आदी बाजारपेठांत शुकशुकाट पसरला होता. ग्रामीण भागातही अशीच कडकडीत बंदची स्थिती होती.
सातारा शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशुकाट
जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वच आस्थापना बंद होत्या. तथापि, लॉकडाऊनची दखल घेत लोकांनी किराणा-भाजीपाला आदींची व्यवस्था आधीच करून ठेवल्याने सर्वच प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण आहे. रोजीरोटीबरोबरच जीवनमरणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने लोकांनी लॉकडाऊन स्वीकारला आहे. त्याचे प्रतिबिंब संपूर्ण लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी काल जिल्ह्यात पाहायला मिळाले. हा लॉकडाऊन कडक पाळला जावा, यासाठी शुक्रवार रात्रीपासूनच पोलिसांनी नाकेबंदीला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रमुख ठिकाणी भेट देऊन या बंदोबस्ताची पाहणी केली. काल सकाळपासूनच जिल्ह्यात प्रमुख चौकांमध्ये पोलीस तैनात होते. सातारा, कराड, वाई, फलटण, महाबळेश्वरसह प्रमुख शहरांत लॉकडाऊनचा प्रभाव ठळकपणे दिसून आला.
सांगलीतील बाजारपेठा बंद; रस्ते निर्मनुष्य
विकेंड लॉकडाऊन सांगली शहरासह जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या, तर रस्ते निर्मनुष्य होते. सांगली, मिरज, विटा, तासगाव या शहरांप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला.
सांगली शहरातील सर्व व्यवहार सकाळपासूनच ठप्प होते. दुकाने आणि व्यवसाय पूर्णपणे बंद होते. त्यामुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या. एखाद दुसरा अपवाद वगळता रस्त्यांवर वाहनांची वर्दळही नव्हती. शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. आजही व्यापारी व नागरिकांनी कालच्याप्रमाणेच लॉकडाऊनला असाच प्रतिसाद देऊन कोरोनाची चेन ब्रेक करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोलापुरात ठिकठिकाणी पोलिसांची नाकेबंदी
शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी पोलिसांनी शहरातील पार्क चौक, सात रस्ता, एसटी स्टॅण्ड, मेकॅनिक चौक, विजापूर रोड, होटगी रोड, आसरा, रेल्वे स्टेशन आदी 21 ठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. अनावश्यक फिरणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगाही उचलण्यात आला.
एरव्ही जमावबंदी असूनही शहरातील सर्व रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होती. दुकाने बंद असूनही वाढलेली गर्दी आश्चर्यकारकच होती. अखेर शुक्रवारी रात्रीपासूनच पोलीस रस्त्यावर उतरले होते. उशिरापर्यंत फिरणारे किंवा गल्लीबोळांत गप्पा मारत बसणारे यांना हुसकावून लावले. शनिवारी सकाळी फिरायला जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला, तर कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना रस्त्यात ठिकठिकाणी अडवून फिरण्याचे कारण योग्य आहे का, याची पडताळणी करत होते.
दुचाकीवर फक्त चालकास परवानगी
पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येईल, तर इतर वाहनांतूनही त्याच्या 50 टक्के क्षमतेनेच प्रवाशांना प्रवास करता येईल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना शनिवारी स्पष्ट केले. येत्या 30 एप्रिलपर्यंत सद्यास्थितीत हा नियम लागू असेल. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असेही त्या म्हणाल्या.
नगरमध्ये एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द
शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासूनच विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील बाजारपेठा बंद होत्या. एसटी बसेसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे बंदच्या काळात आढावा घेत होते.
नगर शहरातील दिल्लीगेट माळीवाडा, पुणे बसस्थानक, नगर मनमाड महामार्ग आदी ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात करून रात्री आठनंतर बाहेर जाणाऱ्यांची चौकशी केली. विनाकारण फिरणाऱ्यांना माघारी पाठविले जात होते. एसटी वाहतूक सुरू होती. मात्र, प्रवाशांची गर्दी नसल्यामुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. चितळे रोड, दिल्ली गेट, माळीवाडा, कापडबाजार, सर्जेपुरा, सावेडी रोड, पाइपलाइन रोड, गुलमोहोर रोड आदी परिसरात सर्वच दुकाने बंद होती.




























































