
सामना ऑनलाईन, मुंबई
आग्रीपाडा परिसरातील कल्पतरू इमारतीत एका उच्चभ्रु कुटुंबाकडे रिता गोगाई (40) ही गेल्या 12 वर्षांपासून मोलकरणीचे काम करीत आहे. त्या कुटुंबाकडेच ती राहतदेखील होती. तिचा एक नातेवाईक रिताच्या मालकिणीच्या संपर्कात होता. रिताची विचारपूस तो मालकिणीकडे करायचा. त्यामुळे त्याचा मोबाईल नंबर मालकिणीकडे होता. दरम्यान, मालकीण व्हॉटस्ऍप बघत असताना तिने रिताच्या नातेवाईकाचा व्हॉटस्ऍप डीपी पाहिला. डीपी त्या नातेवाईकाच्या पत्नीचा होता, पण तिच्या गळय़ातील हार बघून मालकीण हबकलीच. कारण तो हार हुबेहूब तिच्या सोन्याच्या हारासारखा होता. आपला हार गायब असल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी चोरीची तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनानुसार, एपीआय नागेश पुराणिक व पथकाने रिताला ताब्यात घेतले. चौकशीनंतर हार गावातील नातेवाईकाकडे दिल्याचे तिने कबुल केले.
























































