महिला आरक्षण विधेयकावर बोलताना महिला खासदार आक्रमक; ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई का नाही? विचारत सरकारला फोडला घाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
women-mps-in-loksabha

देशाची राजधानी दिल्लीत संसदेचं विशेष अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. यावर आज चांगलीच चर्चा सुरू आहे. या विधेयकावर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यापाठोपाठ इतर महिला खासदारांनीही चर्चेत सहभाग घेतला. मात्र विधेयकावर चर्चा करताना केंद्रातील मोदी सरकारला त्यांनी सोडलं नाही. देशात महिलांवर होणारे अत्याचार, महिला सुरक्षेचे प्रश्न त्यांनी उपस्थित करत सरकारला घाम फोडला.

यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुद्दा देखील चर्चेत राहिला. ‘सरकारला महिलांची इतकीच काळजी आहे तर त्यांनी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पदावरून का हटवलं नाही?, असा सवाल महिला खासदारांनी उपस्थित केला.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार खासदार डॉ. काकोली घोष या चांगल्याच आक्रमक पाहायला मिळाल्या. त्यांनी महिला आरक्षण विधेयक आणण्यामागील सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. ‘तुम्हाला महिलांची इतकीच चिंता होती तर तुम्ही इतक्या उशिरा हे विधेयक का आणलं. निवडणुकीच्या तोंडावर हे विधेयक आणणं म्हणजे तुमच्या हेतूवर शंका उपस्थित करतं. मला या सरकारवर विश्वास नाही. महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई का नाही झाली?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी देखील सरकारला सुनावलं. ‘महिला सक्षम असू शकत नाहीत का? त्यांनी कधी युद्ध लढली आणि जिंकली नाहीत का? इंदिरा गांधींसारख्या मजबूत नेत्या या देशात झाल्या नाहीत का?’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या प्रश्नांवर भाजपच्या खासदारांनी गोंधळ सुरू केला. यानंतर त्यांनी जयललिता देखील सक्षम नेत्या होत्या असं सांगतानाच सोनिया गांधी, मयावती, ममता बॅनर्जी तसंच दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचंही नाव घेतलं.

भाजपचे लोक महिलांचा असाच सन्मान करतात का?

कनिमोझी बोलत असताना भाजपचे खासदार गोंधळ घालायला लागले तेव्हा शेजारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या जागेवर उभ्या राहिल्या. त्यांनी कनिमोझी यांना साथ दिली. भाजपचे लोक महिलांची असाच सन्मान करतात का? असा खणखणीत सवाल उपस्थित केला. त्यानंतर भाजपचे खासदार शांत बसले.