
सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
जंक फूड म्हटले की डोळ्यासमोर येतात, ते बर्गर, पिझ्झा आणि फ्राईज आणि इतर अनेक चमचमीत पदार्थ. हे जंक फूड आरोग्यासाठी घातक असल्याचे माहीत असूनही आपण स्वतःला जंक फूड खाण्यापासून अडवू शकत नाही. याची कारणे संशोधकांनी शोधून काढली आहेत. हे व्यसन सोडवण्यासाठी फक्त इच्छाशक्तीच महत्त्वाची नसून इतर घटकांकडेही लक्ष दिल्यास हे व्यसन सुटू शकते असे संशोधकांनी म्हटले आहे.
50 जणांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांच्या भावना, मूड, स्वभाव, सामाजिक सहभाग आणि दिनचर्येचा 10 दिवस अभ्यास करून संशोधकांनी हे व्यसन का सुटत नाही याची कारणे शोधली आहेत. इतर पौष्टिक खाद्यापेक्षा जंक फूड आकर्षित करत असल्याने आणि त्याने जीभ चाळवत असल्याने कल तेथेच असतो. तसेच ते सहज उपलब्ध होते. रेल्वे स्थानक ,बस स्थानक, विमानतळ, शाळा, कॉलेजच्या परिसरात, ऑफीसजवळ, बाजारात जंक फूड सहजतेने मिळते. त्यामुळे अशा ठिकाणी जंक फूडकडे दुर्लक्ष करावे आणि स्वतःजवळ पौष्टिक पदार्थ ठेवावेत म्हणजे जंकफूडची गरज भासणार नाही. उदास, दुःखी आणि अस्वस्थ वाटत असेल तर अनेकजण जंकफूड खातात. मन उदास असताना जंकफूड खाण्याकडे कल असतो. अशा वेळी भावनांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच आपण काय खात आहोत याकडेही लक्ष देण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. अशावेळी जंकफूड कटाक्षाने टाळावे, यावेळी जंकफूड खाल्ल्यास त्याचे व्यसन लागण्याची शक्यता जास्त असते. भूक लागल्यावर नेहमी बर्गर, पिझ्झा, फ्राईज हे पदार्थ खाण्यची इच्छा प्रबळ होत जाते.
आपण एकटे असताना खातो तेव्हा जास्त खातो आणि कोणासोबत खाल्ल्यास आपल्या खाण्याचे प्रमाण मर्यादित असते. त्यामुळे जेवतना कुटुंबीयांसोबत जेवण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. आपण रिकामे असल्यास विनाकारण खाण्याची इच्छा होते. त्यामुळे नेहमी स्वतःला कामात गुंतवून ठेवावे. तसेच काम करताना समोर खाद्यपदार्थ किंवा जंकफूड ठेवू नये, असेही संशोधकांनी नमूद केले आहे.

























































